मोबाईलच्या नादात विद्यार्थी अभ्यास विसरला

तालुक्यात दहावीचा टक्का घसरला

0 388
ज्योतिबा पोटे, मारेगाव: दहावीच्या निकालात वणी उपविभागात मारेगाव तालुक्याचा नंबर ढँग आला असून तालुक्याचा निकाल केवळ ५३.७०% लागला आहे. तालुक्यातील म्हैसदोडका शाळेचा निकाल तर ५.२६% लागल्याने शिक्षकांच्या शिकवण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मारेगाव तालुका आदिवासी बहुल तालुका असला तरी शिक्षणाचे माध्यम बरेच निर्माण झाले आहे. त्यामानाने झरी तालुक्यात शिक्षणाच्या सोयीसुविधा कमी आहे. मात्र मारेगावने झरीला देखील मागे टाकत शेवटून पहिला नंबर मिळवला आहे. निकालाची टक्केवारी घसरल्याने ही शिक्षक व पालकासाठी चिंतनाची बाब ठरत आहे.
घसरलेल्या निकालात स्मार्टफोनचा मोठा वाटा असल्याचा कयास सर्वसामान्य लावत आहे. केवळ विद्यार्थीच नाही तर शिक्षक व पालक यांच्या हातात पुस्तकांच्या ऐवजी मोबाईल दिसून आला. त्याचा परिणाम या वर्षीच्या निकालावर झाला असल्याचं मत व्यक्त होत आहे. दरवेळेला तालुक्यातुन बाजी मारणाऱ्या मुली या वर्षी निकालात मागे पडल्या. याचा अर्थ अभ्यासात दुर्लक्ष व मोबाइलवर लक्ष असल्याचे बोलले जात आहे. तालुक्यामध्ये दरवर्षी दोन तीन शाळेचा निकाल १००% लागायचा. मात्र यावर्षी ही परंपरा खंडित झाली आहे.
सोबत विद्यार्थ्यांना मिळणारे प्रात्याक्षिक गुणांची दांडीही निकालास कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. परिसरातील एका विद्यार्थी कॉन्सलरशी बोलल्यावर त्यांनी सांगितले की यावर्षी ऍन्ड्रॉईड मोबाईलचा फटका मोठा दिसून आला आहे. त्याला मोठ्या प्रमाणात पालक दोषी आहेत. मोबाईलमध्ये पुस्तकापेक्षा रात्र जागवण्याची क्षमता जास्त असल्याने विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकाऐवजी मोबाईल अधिक वेळ दिसून आला.

आज घडीला माझ्या पाल्याला ९०% च्या वर गुण मिळाले पाहिजे हि मानसिकता समाजात रूढ होताना दिसत आहे. मात्र आदिवासी बहुल मारेगाव तालुक्यात शैक्षणिक महत्व पाहिजे तेवढे दिसत नाही. मोबाईल क्रांतीने मुले, मुली, आई वडील, शिक्षक, शिक्षिका सोशल मिडिया सोबत मोबाईल मधील अनेक चांगल्या वाईट बाबीच्या व्यस्ततेत आहे. त्यामुळे त्यांचे त्यांच्या पाल्यांकडे दुर्लक्ष होत आहे. शिक्षकांचे शिकवण्याकडे, विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे, पालकांचे पाल्याकडे मोबाईलच्या नादात दुर्लक्ष होत असल्याचे आढळून आले आहे.
आज मोबाईलमध्ये ई-लर्निंगसारखी सुविधा आहे. टॅब्लेटच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक संस्था सेल्फ स्टडीची सुविधा पुरवत आहे. वणी सारख्या शहरात अनेक विद्यार्थी या सुविधेचा वापर करतात. मात्र मारेगाव सारख्या परिसरात मात्र अद्याप या सुविधेचा वापर होताना दिसत नाही. मोबाईलवर असलेला विद्यार्थांचा प्रभाव कमी झाला नाही तर याचा फटका 12 वीच्या परीक्षेतही दिसू शकतो.
Comments
Loading...