जादा दराने दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाई कधी ?

बोगस परवाने दाखवून दारूचा सेल

0
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील दारू विक्रेते एमआरपीपेक्षा जादा दराने दारूची विक्री करीत आहे. यामुळे ग्राहकांची मोठी आर्थिक लूट होत आहे. जादा दराने दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई कधी करणार, असा सवाल उत्पादन शुल्क विभागाला नागरिकांनी केला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यापासून तालुक्यातील देशी दारू दुकानदार व बीयर बारचालकांची चांदी होत आहे. तालुक्यातून दररोज शेकडो पेटी देशी व विदेशी दारूची तस्करी चंद्रपूर जिल्ह्यात व तालुक्यातील बहुतांश गावात केली जात आहे. दारू तस्करीतून दिवसाकाठी लाखोची उलाढाल होत आहे. मुकुटबन, मांगली, झरी, पाटण, सतपल्ली या गावांत एकूण ६ देशी दारू दुकान व १२ बीयरबार असून, यातील बहुतांश दुकानातून ही दारू तस्करी होत आहे. काही दारू दुकानदार चिल्लर भावाच्या नावाने पोत्यात पव्वे टाकून विक्री करीत आहे तर काही दुकानदार दारूच्या शिशीवरील लेबल काढून दारूची विक्री करीत आहे.

बीयर बारमध्ये विदेशी दारू, बीयरवर ३० रुपयांपासून तर ४०० रुपयांपयंर्त अधिक दर घेतले जात आहे. देशी दारू दुकानदार ५२.५० रुपयांचा पव्वा ५५ ते ६० रुपयात विक्री करीत आहे. दारू दुकानातून दररोज ४० ते ५० पेटी देशी दारू आलिशान वाहनाने चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक गावांत पोहोचविली जात आहे. याबाबत उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांना पूर्ण माहिती असूनही ‘जियो और जिने दो’ यानुसार अधिकारी भूमिका घेताना दिसत आहे.
विशेष म्हणजे बहुतांश दारू दुकान व बीयर बारमध्ये १८ वर्षांखालील मुलांना बंदी असल्याचे फलकच नाही. प्रत्येक बीयर बारचालकांना ग्रामीण भागात कमी दराने दारूविक्री करावी असे अपेक्षित असताना २० टक्के स्व्हिहस चार्जच्या व्यतिरिक्त अधिक दराने दारू व बीयरची विक्री करीत आहे. विशेष म्हणजे अनेक बारमध्ये सोयीसुविधांचा अभाव आहे. कोणत्याही बीयर बारमध्ये परमिट रूम नाही.
काउन्टर व टेबलावरील दर वेगवेगळे असून, सर्वांकडून सारखेच दर आकारून दररोज लाखो रुपयाने जनतेला लुटत आहे. वणी, मारेगाव व झरी तालुक्यात शेकडो बीयरबार व देशी दारूचे दुकाने असून एकाही बारमध्ये पक्के बिल दिले जात नाही. शासनाच्या नियमाने एका दिवसाकरिता दारू पिण्याचा परवाना पाच रुपये आहे तर पिण्याकरिता एक महिना, एक वर्ष व आजीवन सुद्धा दारू पिण्याचा परवाना काढता येतो.
नियमाने दारू पिण्याचा परवाना व्यक्तीजवळ नसल्यास दारू पिता येत नाही. परंतु सर्वच बार व देशी दारू दुकानात विनापरवाना व अल्पवयीन मुले दिवसरात्र दारू प्राशन करताना दिसत आहे. दारूचा सेल वाढल्याचे दाखविण्यासाठी बोगस परवाने दाखविले जात आहे. बीयर बार व देशी दारूची विक्री दररोज ४०० ते ५०० पेटी दाखविली जाते. यावरून सदर दारू दुकानदार दारूची तस्करी करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. एमआरपीच्या केसेस करणे, दुकानांचा गोपनीय प्रस्ताव पाठविणे स्थानिक अधिकाऱ्यांचे कर्तव्य असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने शंका उपस्थित होत आहे..
Leave A Reply

Your email address will not be published.