‘युरेका युरेका’, ‘सोपान सोपान’ म्हणत सुटावं……

रिंगणच्या 'संत सोपानदेव विशेषांकात उलगडलीत विविध रहस्यं

0

सुनील इंदवामन ठाकरे, वणी: ‘युरेका युरेका’ असं ओरडतच आर्किमिडीज बाथरूममधून सुसाट बाहेर निघाला. त्याला काहीतरी भन्नाट गवसलं होतं. तसाच अनुभव रिंगणचा ‘ संत सोपानदेव’ विशेषांक वाचताना येतो. ‘सोपान! सोपान!’ म्हणत सुटावं असाच कोणतातरी वेगळाच अनुभव हाती येतो. एका क्षणाला वाटतं आपल्याला सोपान सापडला. पुन्हा नव्यानं सोपान शोधण्याची इच्छाही जागृत होते. एकेक लेख पुन्हा पुन्हा मेंदूत पेरून नव्या सोपानपिकाची वाट पाहावी लागते. पारायणांच्या मागचं लॉजिक माहीत नाही; मात्र पुन्हा पुन्हा वाचलं की, रिंगणमध्ये प्रत्येकवेळी काहीना काही नवं गवसतंच. वाक्य तर सोडाच; पण फूलस्टॉप आणि कॉमादेखील अनेकदा विचार करायला भाग पाडतो.

सोपानदेव क्षणोक्षणी अस्वस्थ करतात. विचारांच्या खोल डोहात नेतात. सोपानदेव आपलं बोट धरतात. त्यांच्यासोबत घेऊन जातात. साध्या डोळ्यांनी न दिसणारं सत्य ते दाखवतात. प्रपंच आणि परमार्थाच्या अरुंद बोळीतून कसं जावं ते सांगतात. ते सवाल करतात. करायला लावतात. चार्वाक आणि बुद्धांनी सांगितलेली चिकित्सा ते करायला लावतात. त्यांच्या नावातच खरी गंमत आहे. ‘सोपा-न-देव’ हे विठ्ठलपंत आणि रुक्माईचं तिसरं लेकरू. सोपा न देव म्हणणाऱ्या काळात, त्यांनी देव सोपा केला. सोपानदेव सोपादेवच झालेत.

सोपानदेवांवर विशेष चर्चा होत नाही. कथा, कादंबरी, नाटक, चित्रपट, सिरियल्स या माध्यमातून त्यांना फुलवलं जात नाही. एवढंच नव्हे, तर अपवाद वगळता त्यांचा अभंग कीर्तनकार निरुपणालाही घेत नाहीत. या सोपानदेवांवर ’रिंगण’ने सन2020च्या आषाढीला विशेषांक काढला. संपादक सचिन परब आणि टीमचं अभिनंदनच केलं पाहिजे.

160 पानांचा आर्टपेपरवर विविध लेखकांच्या संशोधन आणि अभ्यासपूर्ण लेखांचा संग्रह असलेला अंक काढणं म्हणजे मज्जाक नाही. या विशेषांकातून संत सोपानदेव आपल्यासोबत संवाद साधतात. ते आपल्याशी बोलतात. प्रत्येकाच्या वेदनांचा बोलका स्वर ते होतात. सकाळी नदीवर गेलो होतो. नदीचा प्रवाह जोरदार होता. काठावर थोडं आत गेलेलं पाणी मात्र शांत होतं. ते नदीपासून वेगळं करणंही शक्य नव्हतं. मध्यभागात सुसाट वाहणारं पाणी म्हणजे नदीच होती. काठावर थोडं शांत असलेलं पाणीदेखील नदीच होती.

हे काठावरील शांत पाणी रौद्रपूर्व अवस्थेतील. त्याला योग्य टाईम आणि पाठबळ मिळण्याचीच फक्त प्रतीक्षा. हे काठावरील शांत पाणी जवळच्या गावात सर्वात आधी जाईल. थैमान घालेल. पूराच्या बाहुपाशांत अख्खं गाव घेईल. रिंगणच्या ‘संत सोपानदेव’ विषेषांकात सोपानदेव असेच वारंवार भेटतात. खूप शांत. अथांग तर कधी अत्यंत आक्रमक.

सोपानदेवांमध्ये क्रांतीने पेटून उठलेला तरूण दिसतो. खूप बुजूर्ग असा विचारवंत आणि तत्त्वचिंतकही दिसतो, सोपानदेवांमध्ये. कॅलिडोस्कोपसारख्या छटा दिसतात सोपानदेवांमध्ये. प्रत्येक दिशेतून सोपानदेव वेगळेच दिसतात. हत्तीचा आणि आंधळ्यांचा दृष्टांत सगळ्यांनाच माहीत आहे. ते आंधळे हत्तीच्या ज्या भागाला हात लावतात, तसा त्यांना हत्ती दिसतो. रिंगणच्या ‘संत सोपानदेव’ विशेषांकात एक्स्पर्ट लेखकांनी मांडलेले सोपानदेव असेच दिसतात.

सोपाननाथ संत निवृत्तीनाथांचे शिष्य आहेत. संत ज्ञानदेवांचे धाकटे भाऊ आहेत. मुक्ताईला सांभाळणारे तिथे थोरले भाऊ आहेत. तीन रिलेशन्स आणि तीन अँगल्सनी सोपानदेव वेगळेच आहेत. सोपानदेव वगळता या तिन्ही भावंडांवर खूप चर्चा, लिखाण झालं नि होत आहे. सोपानदेव तसे अलिप्तच राहतात. त्यांच्यावर विशेष चर्चा होत नाही. ती चर्चा करण्याचा एक वेगळा, मोठा आणि नितांत सुंदर प्रयत्न रिंगणच्या ‘संत सोपानदेव’ विशेषांकात झाला. सोपानदेव या भावंडांच्या कथानकांमध्ये साईडहिरोच राहिलेत.

त्यांच्यातला अँग्री यंग मॅन समोर आणण्याचा प्रयत्न फारसा कुणी केलेला दिसत नाही. जन्माने जात, वर्ण आणि धर्म ठरतो. यावर ते खडा सवाल करतात. रामायण लिहिणारे वाल्मिकी किंवा महाभारत लिहिणारे व्यास यांच्या कुळाची चर्चा करतात. या दोन महान विभुतींचं जाती किंवा धर्मावाचून काही अडलं नाही. तर आपलं काही अडणार काय, असा प्रतिप्रश्नही ते करतात.

निवृत्तीनाथ हे नाथसंप्रदायातले. त्यांना ‘ब्राह्मण्य’ ह्या सर्टिफिकेटची गरजही वाटत नव्हती. ‘आम्ही जुनाट’ असंही त्यांनी जाहीर केलं होतं. आपलं प्राचीनत्व त्यांनी स्पष्ट केलं. तरी त्याकाळात जगण्यासाठी हे सर्टिफिकेट गरजेचं असल्याचं ज्ञानदेव माउलींना वाटलं असावं. निवृत्तीनाथ हे मोठे भाऊ. आई-वडील नसल्याने माय-बापाच्याच भूमिकेत. त्यातही हे या तिन्ही भावंडांचे सद्गुरू. तरीदेखील सोपानदेव त्यांच्यासमोर आपली बाजू ठामपणे मांडतात.

सोपानदेव हे सत्याचा आग्रह धरणारे प्राचीन सत्यााग्रही आहेत. ह्या सत्याग्रही कार्यकर्त्याची अनेक रूपं रिंगणच्या ‘ंसंत सोपानदेव’ विशेषांकात दिसतात. वारकरीधर्मातील निस्सीम भक्ताला हा अंक सुखावेलच. सोपानदेवांच्या भेटीचाही आनंद देईल. त्याचसोबत कुठल्याही चळवळीतल्या लढवय्यालाही हा अंक प्रेरणा देईल, यात शंका नाही.

संत साहित्याचे जगविख्यात अभ्यासक डॉ. सदानंद मोरे या अंकात खऱ्या वारींचं माहात्म्य सांगतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरची वारी सांगतात. संत नामदेव, छत्रपती शिवरायांपासून तर अलीकडच्या काळातील वारींवर ते चर्चा करतात. रिंगणच्या संपादकांना सोपानदेवांमधला संपादक दिसला. सोपानदेव संपादक कसे होते, यावर रिंगणच्या ‘संत सोपानदेव’ विशेषांकात ते चर्चा करतात. मीडिया, लेखन आणि प्रकाशनक्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी उत्कृष्ट विश्लेषण सचिन परब यांनी केलंय.

पुणे, बारामतीच्या जवळ सासवड येथे संत सोपानदेवांची समाधी आहे. या सासवडला प्रत्यक्ष जाऊन तिथला ऑंखों देखा हाल कम्प्युटर इजिनियर असलेले संत साहित्याचे अभ्यासक अभय जगताप सांगतात. सासवड या गावाचं प्राचीनत्व आणि महत्त्व या विशेषांकात सांगितलं आहे. ‘आदिनाथ गुरू सकळ सिद्धांचा’ या ओवीतून ज्ञानदेव माउलींनी त्यांची नाथपरंपरा मांडली. या नाथपरंपरेचा थोडक्यात; पण क्रीम आढावा पत्रकार दशरथ यादव यांनी घेतला. सासवड म्हटलं तर आचार्य अत्रेंना विसरून कसं चालेल? त्यांचाही हालहवाल मुंबईतले पत्रकार प्रशांत जाधव यांनी घेतला.

आळंदी हे ज्ञानदेवादी भावंडांचं आजोळ. त्यांच्या आईचं माहेर. याच आळंदीत या भावंडांना आधार घ्यावा लागला. इथल्या हिरो आणि व्हिलन यांना फेस करावं लागलं. याच आळंदीतून आयटी क्षेत्रातील राहुल बोरासे यांनी बरंच काही टिपलं. ते रिंगणच्या ‘सोपानदेव विषेषांकात’ आलंय. विठ्ठलपंतांचं मूळ गाव आपेगाव. तेच निवृत्तीनाथांदी भावंडांचं जन्मस्थान. साडेसातशे वर्षांनंतर या गावात या भावंडांच्या खाणाखुणा शोधण्याचा प्रयत्न दादासाहेब घोडके यांनी केला.

पंढरपूर हे वारकरी धर्माचं हेडक्वॉर्टर. इथं संत सोपानदेव आलेत. थांबलेत. गेलेत. भूवैकुंठातील सोपानदेवांची स्मृतिचिन्ह धुंडाळून काढलीत पत्रकार सुनील दिवाण यांनी. वारी म्हटलं की, पालखी येतेच. या पालखीसोबत तिचा इतिहासही येतो. नारायण गोसावी ह्यांनी नेमक्या शब्दांत पालखीची शब्दयात्रा मांडली.

संत हे ग्लोबलच असतात. होते नि आहेत. सोपानदेवांचं बुलडाणा कनेक्शन हे सुखद धक्का देणारंच आहे. चित्रकार, ग्रंथविक्रेते आणि रिंगणचे वितरक प्रदीप पाटील यांनी हे कनेक्शन उलगडून दाखवलं. या भावंडांचे आई-वडील विठ्ठलपंत आणि रुक्मिणी. त्यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकला डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांनी.

निवृत्तीनाथ, ज्ञाननाथ, सोपाननाथ आणि मुक्ताईनाथ ही भावंडं. यांच्यात केवळ दोन-दोन वर्षांचा फरक. तरीही त्यांचं अनुभवविश्व निराळंच. त्यांच्यातील इमोशनल, डिव्होशनल आणि प्रॅक्टिकल नात्यांचा वेध युवा कीर्तनकार ज्ञानेश्वर बंडगर ह्यांनी घेतला. सोपादेव विविध भूमिकांमधून आपल्याला भेटतात. मुक्ताईसोबतचं त्यांचं नातं भाऊ, सखा आणि आई-वडीलम्हणूनही फुलत जातं. अमृता देसर्डा यांनी ते सुरेख मांडलंय. सोपानदेव समकालीन संतांच्याही अत्यंत जिव्हाळ्याचे आहेत. ही संतमंडळी विविध ठिकाणी सोपानदेवांवचा गौरव त्यांच्या अभंगांतून करतात. ज्ञानेश्वर भोसले यांनी याचा मुद्देसूद आढावा घेतला. संत विसोबा खेचर हे सोपानदेवांचे शिष्य होते, की नव्हते, हा वाद दुय्यम आहे. एक गोष्ट मात्र खरी आहे. ती म्हणजे विसोबांनी संत सोपानदेवांवर लिहिलेही आरती. यावर विशाल अभंग यांनी चर्चा केलीय.

विठोबांचा साऊथ टच सर्वांनाच माहीत आहे. ‘कानडा हा विठ्ठलू कर्नाटकू’ आहे, असाही दावा नेहमीच होतो. नाथ संप्रदाय आणि सोपानदेवांचं साऊथ कनेक्शन डॉ.धनंजय होनमाने यांनी मांडलंय. सोपानदेवांच्या आधीच्या शतकात महात्मा बसवण्णा झालेत. त्यांनी क्रांतीचं बीज पेरलं. त्यांच्या जुळणारी सोपानदेवांची लिंक चन्नवीर भद्रेश्वरमठ यांनी शोधून काढली. सासवडच्या संत सोपानदेव समाधीमंदिराची सेवा गोसावी कुटुंबीय करीत आहेत. या परिवारातील अविनाश गोसावी ह्यांनी ही सेवेची परंपरा रिंगणच्या ‘संत सोपानदेव’ विशेषांकात मांडली.

रिंगणचं मुखपृष्ठदेखील एक चिंतनाचा विषय असतो. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार भास्कर हांडे यांनी मृखपृष्ठासाठी संत सोपानदेवांचं चित्र काढलं. चित्रासाठी लागणारी ऐतिहासिक पार्श्वभूमी, मनोवस्था आदी अनेक सूक्ष्म विषयांवर स्वतः चित्रकार हांडे यांनी मनोहर विश्लेषण केलंय.

‘सोपान वाकुल्या दावी’ हे रंगनाथ तिवारी ह्यांच्या लेखाचं शीर्षकच पाहताक्षणी आपल्याला सोपानदेवांकडे खेचते. मग थोडं खोलात गेल्यावर त्यांच्या काही अभंगांची मुशाफिरी लेखक घडवतात. ‘भक्ती हे सरती, जाती न सरती’ हे सोपानदेवांचं क्रांतिकारी स्टेटमेंट. सोपानदेवांमधला बंडखोर क्रांतिकारक यातून पुढे उभा होतो. अॅड. देवदत्त परुळेकर त्यांच्या लेखातून सोपानदेवांचा ‘समन्वयातून विद्रोह’ उलगडून दाखवतात.

सूर्याच्या अत्यंत जवळ असलेला ग्रह म्हणजे बुध. सोपानदेवाला ‘विबुध क्रांतिघोष’ मानून नंदन रहाणे ह्यांनी सोपानदेवांवर वेगळ्या अँगलने प्रकाश टाकला. अन्य समकालीन संतांच्या तुलनेत सोपानदेव हे वयाने लहानच. तरीदेखील ते ‘काका’ होते. सोपानकाका होते. त्यांच्या या नात्याची संतांच्या मांदियाळीतील वीण कीर्तनकार श्यामसुंदर सोन्नर यांनी स्पष्ट केली. संत सोपानदेवांच्या व्यक्तिमत्त्वाचा अगदी थोडक्यात वेध घेण्याचा प्रयत्न विवेक पंचगव्हाणकर चौधरी यांनी केला.

ह्या भावंडांवर त्यांच्या माय-बापांवर समाजानं बहिष्कार टाकला. त्याला जवळचा शब्द ‘ग्रामण्य’. हे ग्रामण्य काय आहे, त्याचा इतिहास स्वामिराज भिसे रिंगणच्या ‘संत सोपानदेव’ विशेषांकात सांगताहेत. संत सोपानदेवांचे अभंग टेक्निकली कसे आहेत हे डॉ. सतीश बडवे लिहितात. त्यांच्या अभंगांचं रसग्रहणही त्यांनी केलं आहे. सोपानदेवांच्या अभंगांचा शैलीशास्त्रीय परामर्श डॉ. फुला बागूल यांनी घेतला. सोपानदेवांचाही हरिपाठ होतो. या हरिपाठावर सुरखे विवेचन केलंय, प्रतिभा औटी पंडित ह्यांनी.

ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी आहे. तशीच सोपानदेवांची सोपानदेवी आहे, असं काही अभ्यासक किंवा वारकरी मानतात. खरं काय नि खोटं काय याच आकलन डॉ. न. ब. कदम यांच्या लेखातून होईल. या सोपानदेवीवरच डॉ. वि. ना. गंधे यांनीदेखील रिंगणमध्ये भाष्य केलंय. सोपानदेवांनी समाधीपूर्वी ‘नमन’ म्हटलं. ते संत नामदेव माउलींनी नोंदवलं. ह्या अखेरच्या नमनावर प्रवचनकार सत्यवती एदलाबादकर यांनी अभ्यासपूर्ण विवेचन केलंय. मुक्त पत्रकार हर्षा परब ह्यांनी सोपानदेवांना ‘अलक्षित अभंगकर्ता’ म्हणून मांडलं. किंबहुना त्यावर विवेचनदेखील केलंय.

एक रेशन दुकानदार सोपानदेवांवर संशोधन करतो. त्याची कहाणी अभिजित सोनावणे यांच्या लेखणीतून वारंवार वाचावी अशीच आहे. नाथ संप्रदायाच्या खाणाखुणा डॉ. अशोक कामत ह्यांनी शोधून काढल्यात. ’ड्राफ्ट्समन ते सोपानदेव’ हे अंजली सायगावकर यांचं अनुभवकथनदेखील वाचनीय आहे. कथा, कादंबऱ्यांतून ज्ञानदेवादी भावंडांचं चरित्र येतं. त्यातील सोपानदेवांचा वेध डॉ. राजेंद्र थोरात ह्यांनी घेतला.

विविध कादंबऱ्यांतून सोपानदेवांना शोधण्याचा प्रयत्न लेखकाने केलाय. सेम गोष्ट चित्रपटांच्याही बाबतील लागू होते. अमृता मोरे ह्यांनी सोपानदेवांना विविध चित्रपटांतून शोधण्याचा प्रयत्न केलाय. आजच्या ऑनलाईन विश्वात सोपानदेवांवरचे ऑनलाईन प्रयोगही रिंगणने समोर आणलेत. सोशल मीडियातले सोपानदेव थोडक्यात; पण जबरदस्त मांडलेत. हिंदी लेखक सोपान जोशी यांच्या नावाच्या रंजक हिस्ट्रीचं शब्दांकन शर्मिष्ठा भोसले ह्यांनी केलंय. सोपानदेव चौधरी हे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे चिरंजीव. त्यांच्या कविता आणि नामसाधर्म्य ह्यावर डॉ. प्रकाश सपकाळे यांनी चर्चा केली.

लॅबमधील जणू प्रयोगच आहे सोपानदेव विशेषांक

रिंगणचा ‘संत सोपानदेव’ विशेषांक खरोखरच वाचनीय आहे. संग्रणीय आहे. आरशासारखीच यात विषयांची मालिका आहे. ज्याने डोकावावं, त्याला त्याचं प्रतिबिंब दिसावं, अगदी असंच. http://www.ringan.inया वेबसाईटवर अंकाचे डिटेल्स आहेतच. वितरणाचं कार्य मुंबईहून सुधीर शिंदे 9867752280 तर विदर्भातून प्रदीप पाटील 9860831776 करीत आहेत. लॅबमध्ये प्रयोग करून काहीतरी नवीन शोध लागतो. रिंगण वाचताना आणि वाचून झाल्यावरही ‘युरेका युरेका’ किंवा ‘सोपान सोपान’ म्हणत निघावं. असंही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नक्की वाचा रिंगणचा 2000सालातला ‘संत सोपानदेव’ विशेषांक.

अतुल बनसोड, रिंगणचे वाचक

सुनील इंदुवामन ठाकरे
रिंगणसेवक, अमरावती

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.