रामनामाने दुमदुमली वणी, युवतींनी वाहिली पालखी

काळाराम मंदिरात दिव्यांची आरास

0 600

श्रीवल्लभ सरमोकदम (विशेष प्रतिनिधी) वणी: शुक्रवारी दिनांक 13 एप्रिल रोजी पार पडलेल्या रामनवमी उत्सवाने वणी शहर अक्षरशः न्हाऊन निघाले. प्राचीन काळाराम मंदिरात दिव्यांची आरास मांडण्यात आली होती. तर मध्यवस्तीतील राममंदीरातून निघालेल्या शोभायात्रेची मुख्य पालखी यावर्षी युवतींनी वाहिल्याने हे या उत्सवाचे वैशिष्ट्य ठरले.

गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या रामनवरात्राची सांगता शनिवारी रामनवमीला झाली. मध्यवस्तीतील राम मंदिरात दुपारी बारा वाजता रामजन्माच्या कीर्तनानंतर रामनामाचा प्रचंड जल्लोष झाला. जन्माच्या वेळी वाजंत्रीही लावण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही सायंकाळी शोभायात्रा काढण्यात आली. विशेष म्हणजे यावेळी प्रथमच महाविद्यालयीन युवतींनी शोभायात्रेची मुख्य पालखी सुरुवातीपासून अखेरपर्यंत अनवाणी पायाने वाहिली. पांढरा कुर्ता, झब्बा व डोक्यावर भगवी पगडी परिधान केलेल्या या युतीमध्ये प्रचंड उत्साह जाणवत होता.

विशेष म्हणजे संपूर्ण शोभायात्रेत महिला व युवक-युवतींची संख्या सर्वाधिक होती. कलशधारी युवती, युवतींचे लेझीम पथक, अनेक भजनी मंडळ अशा अनेक दृश्यांनी शोभायात्रा वैशिष्ट्यपूर्ण ठरली. शोभायात्रेतील सुरुवातीलाच असलेली रामचंद्राची भव्य मूर्ती विशेष प्रकाशयोजनेमुळे आकर्षक ठरली. त्याच धर्तीवर अश्वारूढ शिवाजी महाराजांची वेशभूषा अनेकांचे लक्ष वेधून घेत होते. सायंकाळी साडेसहा वाजता सुरू झालेली शोभायात्रेची सांगता रात्री दहा वाजता झाली.

स्वयंसेवकांनी शोभायात्रेत राबवले स्वच्छता अभियान

शोभायात्रेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियान राबवले. स्वयंसेवकांच्या मोठा ग्रुप यावेळी शोभायात्रेच्या मागे होता. शोभायात्रा निघाल्यानंतर सेवकांनी रस्त्यावर झालेला विविध प्रकारचा कचरा जसे नाश्त्यांच्या प्लेट, पाण्याचे ग्लास इत्यादी कचरा त्वरित साफ करून रस्ता लगेच स्वच्छ केला. गेल्या दोन वर्षांपासून स्वयंसेवक हे अभियान शोभायात्रेत राबवत आहेत. इतर रॅलीमध्येही हा पायंडा पडणे गरजेचे आहे. त्यामुळे स्वच्छता होण्यास मदत होईल, शिवाय प्रशासनाचा ताण देखील कमी होण्यास मदत होईल.

Comments
Loading...