रस्त्याच्या कामावरून वाद; मजुरावर रॉडने प्राणघातक हल्ला

रस्त्यावर गोटे टाकल्याच्या कारणावरून वाद, चौघांवर गुन्हा दाखल

 बहुगुणी डेस्क, वणी: रस्त्यावर सुरू असलेल्या कामावरून झालेल्या वादातून एकाला लोखंडी रॉड व हाताबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना मारेगाव तालुक्यातील करणवाडीफाटा येथील वृंदावन बारसमोरील रस्त्यावर घडली. या प्रकरणी मारेगाव पोलिस ठाण्यात चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, प्रदीप नागोराव आत्राम (वय 32) हे रा. नरसाळा, ता. मारेगाव येथील रहिवासी असून ते रोजमजुरी करतात. दि. 1 जानेवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 2 वाजता मारेगावहून आपल्या गावाकडे जात होते. वाटेत करणवाडीफाटा येथे रस्त्याच्या कामादरम्यान रस्त्यावर गोटे टाकले होते. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी रस्त्याचे काम करणा-या ट्रॅक्टर चालकास याबाबत सांगितले. याच कारणावरून वाद उफाळून आला.

थोड्याच वेळात ठेकेदार, ट्रॅक्टर चालक व त्याचे दोन साथीदार आले. त्यांनी प्रदीप यांना रस्त्याच्या बाजूला नेऊन लोखंडी रॉडने पाठीवर व हातावर, तसेच हाताबुक्क्यांनी चेहरा व डोक्यावर मारहाण करून गंभीर जखमी केले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांकडून हल्लेखोरांची ओळख पटली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मारहाणीत जखमी झालेले प्रदीप हे उपचारासाठी गेले. वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी मारेगाव पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी गिरीधारी बाबूलाल सैनी (वय 25), भोजराज भरतलाल सैनी (वय 21), छोटू रामकिशोर मिना (वय 30) व एक अनोळखी आरोपी असे चौघांवर बीएनएसच्या कलम 118 (1) व 3 (5) नुसार गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी हे राजस्थान राज्यातील रहिवासी आहे. सदर गुन्ह्याचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

Comments are closed.