अतिवृष्टीने हिरावले पीक… आर्थिक तणावात शेतकऱ्याची आत्महत्या

यावर्षी काहीच उरले नाही म्हणत काही क्षणातच ते जमिनीवर कोसळले...

बहुगुणी डेस्क, वणी: शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या एका परिश्रमी शेतकऱ्याने नैराश्याच्या गर्तेत जाऊन जीवन संपवले… अतिवृष्टीमुळे पीक पूर्णतः नष्ट झाले, आर्थिक अडचणींनी ग्रासले, आणि अखेर रोहपट (डुबली पोड) येथील भीमा तुकाराम आत्राम (वय 61) यांनी सोमवारी दि. 27 ऑक्टोबर रोजी सकाळी आत्महत्या केली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

प्राप्त माहितीनुसार, भीमा आत्राम यांच्याकडे सात एकर शेती होती. यंदाच्या अतिवृष्टीने त्यांच्या शेतातील सर्व पीक नष्ट झाले होते. गेल्या काही दिवसांपासून ते आर्थिक संकटात आणि मानसिक तणावाखाली होते. सोमवारी सकाळी ते शेतात गेले होते. मात्र काही वेळाने ते परत आले. आल्यावर ते मुलांना म्हणाले, “यावर्षी काहीच उरले नाही…” आणि काही क्षणातच जमिनीवर कोसळले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्यांच्या उलटीतून कीटकनाशकाचा वास आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी विषारी पदार्थ सेवन केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. कुटुंबीयांनी तात्काळ त्यांना मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

भीमा आत्राम यांच्या पश्चात एक मुलगा, सून आणि नातवंड असा आप्तपरिवार आहे. त्यांच्या जाण्याने रोहपट परिसरात शोककळा पसरली आहे. स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी या शोकाकुल कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. या घटनेने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या असुरक्षिततेचा आणि मानसिक तणावाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Comments are closed.