अडगळीत पडलेली सायकल देणार गरजू विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना गती…

स्माईल फाउंडेशनचा उपक्रम, जुनी सायकल दान करण्याचे आवाहन

बहुगुणी डेस्क, वणी: शैक्षणिक प्रवासात साधनांची कमतरता अनेकांना अडथळा ठरते. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शाळेत पोहोचण्यासाठी चालत प्रवास करतात. हीच गरज ओळखून स्माईल फाउंडेशनने “सायकल बँक” उपक्रम सुरू केला आहे. वापरात नसलेल्या, चांगल्या स्थितीत असलेल्या सायकली दान स्वरूपात स्वीकारून त्या गरजू विद्यार्थ्यांना मोफत दिल्या जातात. तुमच्या घराच्या कोप-यात वापरात नसलेली सायकल दान करावी, असे आवाहन स्माईल फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे. यासाठी 7038204209 या क्रमांकावर संपर्क साधावा लागणार आहेय स्माईल फाउंडेशनची टीम सायकल त्या ठिकाणाहून गोळा करेल. तसेच ज्यांना सायकल विकत घेण्यासाठी आर्थिक मदत करायची आहे ते आर्थिक मदत देखील करू शकतात. 

शहरातील एका तरुणाने स्वतःची सायकल दान केली. आणि त्यातून सुरू झाली एक सामाजिक चळवळ. स्माईल फाउंडेशनच्या “सायकल बँक” उपक्रमाने गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला नवी चालना दिली आहे. या उपक्रमाची सुरुवात इंजिनिअरिंग विद्यार्थी मोहित हांडे यांनी स्वतःची सायकल दान करून केली. ही सायकल गरजू विद्यार्थ्याला देण्यात आली. या वर्षी देखील हा उपक्रम राबवला जाणार आहे. अभ्यासात प्रगती आहे आणि सायकलची खरी गरज आहे. एका सायकलमुळे त्याच्या शैक्षणिक प्रवासाला गती मिळणार आहे. 

सायकल ठरणार टर्निंग पॉइंट
तुमच्या घराच्या कोपऱ्यात पडलेली एक सायकल, एखाद्या विद्यार्थ्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकते. दररोज शाळेसाठी अनेक विद्यार्थी किलोमीटरचा प्रवास पायी करतात ते फक्त शिक्षण मिळवण्यासाठी. पण प्रवासातील हीच अडचण त्यांच्या स्वप्नांना अडथळा बनते. आपल्या वापरात नसलेली सायकल दान करा, ती एखाद्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचती केली जाईल. ही केवळ सायकल नाही, तर ज्ञानाकडे नेणारी पहिली पायरी आहे. – सागर जाधव, अध्यक्ष स्माईल फाउंडेशन

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

स्माईल फाउंडेशनचे अध्यक्ष सागर जाधव, उपाध्यक्ष पियुष आत्राम, सचिव आदर्श दाढे, तसेच विश्‍वास सुंदरानी, उत्कर्ष धांडे, खुशाल मांढरे, कुणाल आत्राम, रोहन कोरपेनवार, सचिन जाधव, तन्मय कापसे, अनिकेत वासरीकर, कार्तिक पिदुरकर, जगदीश गिरी, शुभम भेले, भूषण पारवे, सिद्धार्थ साठे आदी सदस्य या उपक्रमासाठी परिश्रम घेत आहेत.

स्माईल फाउंडेशन ही संस्था वर्षभर पर्यावरण, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात सामाजिक उपक्रम राबवते. “सायकल बँक” उपक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी आपल्या वापरात नसलेल्या सायकली दान कराव्यात, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

Comments are closed.