रोटरीच्या कार्यात प्रत्येकांनी खारीचा वाटा उचलावा: मोकालकर
अनिल उत्तरवार व निकेत गुप्ता यांनी स्वीकारला रोटरीचा पदभार
बहुगुणी डेस्क, वणी: जागतिक स्तरावर रोटरी क्लब एक समाजसेवेचे मंदिर आहे. या मंदिराच्या माध्यमातून स्वयंस्फूर्तीने सुरू असलेले कार्य एखाद्या देवदूताप्रमाणे आहे. या कार्यात भर घालण्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलण्यासाठी सिद्ध व्हावे. रोटरी क्लबच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य करण्यासाठी आपल्या वर्तुळाच्या बाहेर जात मैत्रीचे संबंध वाढवावेत. प्रसंगी विविध संस्था व उद्योजकांकडून मदत मिळवून आपले कार्य सुरू ठेवावे, असा संदेश रोटरीचे माजी प्रांतपाल महेश मोकालकर यांनी दिला. .
वणी रोटरी क्लबच्या पदग्रहण सोहळ्यात ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते. व्यासपीठावर रोटरीचे साहाय्यक प्रांतपाल अरूण तिखे, माजी न.प. उपाध्यक्ष राकेश खुराना, मावळते अध्यक्ष पीयूष जयस्वाल आदी उपस्थित होते. दीपप्रज्वलन व आराध्या चौधरी हिच्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मावळते अध्यक्ष जयस्वाल यांनी अध्यक्षपदाची सूत्रे अनिल उत्तरवार यांच्याकडे, तर सचिवपदाची सूत्रे बंटी खुराना यांनी निकेत गुप्ता यांच्याकडे दिली.
नवनिर्वाचित अध्यक्ष व सचिवांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली. यामध्ये अनाथ मुलांच्या जेवणाचा खर्च, गरीब मुलांना शाळेची बॅग वितरित करणार आहे. सन १९-२० च्या उत्सवादरम्यान कन्यादान महादान विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन ॲड. नीलेश चौधरी यांनी केले. तर आभार प्रदर्शन सचिव निकेत गुप्ता यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.