वणीमध्ये रोटरी महोत्सवाची तयारी जोमात, 6 दिवस रंगणार उत्सव
फूड झोन, अमेझॉन पार्कसह खरेदी-मनोरंजनाची पर्वणी
बहुगुणी डेस्क, वणी: रोटरी क्लब ब्लॅक डायमंड सिटी, वणीच्या वतीने आयोजित रोटरी महोत्सव २०२६ च्या भव्य आयोजनाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले. हा बहुप्रतिक्षित महोत्सव २१ ते २६ जानेवारी २०२६ या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समिती, वणी येथे दिमाखात रंगणार आहे. वणी शहर व परिसरातील नागरिकांसाठी हा सहा दिवसीय महोत्सव खरेदी, मनोरंजन आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांची खरी पर्वणी ठरणार आहे. महोत्सवात विविध आकर्षणांची रेलचेल असणार आहे.
महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे भव्य फूड झोन. येथे स्थानिक तसेच बाहेरील विविध चाट पदार्थ, पाणीपुरी, भेळ, डोसा, पंजाबी व चायनीज खाद्यपदार्थ, मिठाई, आईस्क्रीम यांसह अनेक चविष्ट पदार्थ उपलब्ध राहतील. खाण्याच्या शौकिनांसाठी हा झोन खास आनंद देणारा ठरेल.
महोत्सवातील आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे अमेझॉन पार्क. लहान मुले ते तरुणांपर्यंत सर्व वयोगटांसाठी विविध झुले, राईड्स व मनोरंजनात्मक खेळ उपलब्ध असतील. रोमांचक झुले, फिरते झोके आणि आकर्षक राईड्समुळे कुटुंबासह येणाऱ्या नागरिकांना मनमुराद आनंद लुटता येईल.
महोत्सवात जनरल स्टॉल, प्रीमियम स्टॉल तसेच विविध प्रकारचे स्टॉल्स उभारले जाणार आहेत. येथे घरगुती वापराच्या वस्तू, कपडे, सजावटीच्या वस्तू, दैनंदिन गरजेच्या वस्तू, भेटवस्तू, हस्तकला व इतर अनेक प्रकारच्या वस्तू उपलब्ध असतील. एकाच ठिकाणी सर्व प्रकारची खरेदी करण्याची सुवर्णसंधी नागरिकांना मिळेल.
भूमिपूजन कार्यक्रमाला रोटरी क्लबचे अध्यक्ष लवलेश लाल, सचिव गौरव जोबनपुत्रा, रोटरी महोत्सव अध्यक्ष अश्विन कुमार कोंडावर यांच्यासह क्लबचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी, सेवाभाव, मनोरंजन आणि व्यापार यांचा सुंदर संगम असलेला हा महोत्सव वणी शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक जीवनात नवी ऊर्जा निर्माण करेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. वणीकर नागरिकांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महोत्सवाचा मनमुराद आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.



Comments are closed.