विवेक तोटेवार, वणी: वणी शहरातील तंबाखू तस्करी प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. पोलीस प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचा गंभीर आरोप करत युवासेनेने थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. पंचशील नगर येथे 8 डिसेंबर 2025 रोजी जप्त करण्यात आलेल्या सुगंधित तंबाखू प्रकरणात गोलमाल असून कर्तव्यात कसूर करणा-यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनानुसार, जागरूक नागरिकांनी ‘112’ क्रमांकावर दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू जप्त केली होती. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल केले होते. मात्र प्रत्यक्ष गुन्ह्यात वापरलेले वाहन अद्याप जप्त न करण्यात आल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे.
सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्ष साक्षीदार आणि वाहनाची संपूर्ण माहिती उपलब्ध असूनही तब्बल 10 दिवस उलटूनही कारवाई न होणे हे जाणीवपूर्वक केलेले दुर्लक्ष असल्याचा आरोप युवासेनेने केला आहे. यामुळे तंबाखू तस्करीमागील आर्थिक साखळी व मुख्य सूत्रधार उघड होण्यास अडथळा येत असल्याचेही निवेदनात नमूद आहे.
मुख्य सूत्रधार मोकाट?
तंबाखू तस्करी प्रकरणात मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू जप्त होऊनही या संपूर्ण कारवाईमागील मुख्य सूत्रधार अद्याप मोकाट असल्याची गंभीर चर्चा वणी शहरात रंगली आहे. सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि वाहनाची संपूर्ण माहिती उपलब्ध असूनही पोलिसांनी अद्याप मुख्य आरोपीला अटक न केल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या दिरंगाईमुळे तंबाखू तस्करीमागील आर्थिक साखळी उघड होण्यास अडथळा निर्माण होत असल्याचे युवासेनेने स्पष्ट केले आहे.

युवासेनेने स्पष्ट केले आहे की संबंधित वाहन तात्काळ जप्त करून वाहन मालक व चालकावर कठोर कारवाई करावी. तंबाखू मागवणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करून तपासात दिरंगाई करणाऱ्या तपास अधिकाऱ्याला निलंबित करणे आवश्यक आहे. जर येत्या 48 तासांत ठोस कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवासेनेने दिला आहे.
या प्रकरणात पोलीस अधीक्षकांनी स्वतः लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली असून, संपूर्ण घटनेमुळे वणी शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. (इमेज एआय जनरेटेड)



Comments are closed.