बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहर व परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत आहे. गेल्या महिनाभरात दोन वेगवेगळ्या प्रकरणांत चोरट्यांनी 50 हजार रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या दोन मोटारसायकल लंपास केल्या. शेताजवळ व मुख्य बाजारपेठेत घडलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही प्रकरणांत वणी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.
पहिली घटना ही वणी बाजारपेठेतील आहे. फिर्यादी बंडू दादाजी उपासे (वय 63, रा. साखरा-कोलगाव, ता. वणी) हे शेतकरी असून, ते गेल्या 18 वर्षांपासून हिरो होंडा स्प्लेंडर प्लस (क्र. MH-29 S 7908, काळ्या रंगाची निळे पट्टे, किंमत 20 हजार रुपये) वापरतात. 28 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता ते कुटुंबासह मार्केटमधील बालाजी ज्वेलर्स येथे दागिने खरेदीला गेले. मोटारसायकल दुकानासमोर लावली. दागिने घेऊन 4.15 वाजता बाहेर आल्यानंतर मोटारसायकल गायब होती. शोध घेतला तरी सापडली नाही. 6 जानेवारी रोजी त्यांनीही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
दुसरी घटना ही वागदरा येथील शेतशिवाराजवळील आहे. फिर्यादी प्रमोद नत्थुजी पावडे (वय 47, रा. वाघदरा, ता. वणी) हे शेतकरी आहेत. 16 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी सुमारे 12.30 वाजता ते वणी शेत शिवारातील शेतावर मोटारसायकलने गेले. पांदन रस्त्यावर मोटारसायकल (हिरो होंडा, क्र. MH-29-AE-5165, किंमत 30 हजार रुपये) ठेवून ते शेतात कामाला लागले. सायंकाळी 5 वाजता परत आल्यानंतर मोटारसायकल गायब होती. शोध घेतला तरी सापडली नाही. प्रकृती अस्वस्थतेमुळे उपचारासाठी बाहेरगावी गेलेले फिर्यादी 6 जानेवारी 2026 रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून आले.
दोन्ही घटनांमध्ये चोरटे दिवसाढवळ्या लक्ष्य साधत असल्याचे दिसते. शेतकरी व ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून दुचाकी चोरीच्या या घटनांनी परिसरात असुरक्षिततेची भावना निर्माण केली आहे. पोलीस अधिक तपास करीत असून, चोरीला गेलेल्या मोटारसायकलचा शोध घेत आहेत. नागरिकांनी दुचाकी सुरक्षित ठिकाणी लावावी व संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात येत आहे. (ईमेज एआय जनरेटेड)



Comments are closed.