कोळशाच्या जड वाहतुकीमुळे रस्त्याचे तीनतेरा
रुईकोट ते अर्धवन रस्त्याची दुर्दशा, प्रशासन झोपेत
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पांढरकवडा (ल.) येथे टॉपवर्थ कोळसा खान असून, त्या खदाणीतून कोळशाची जड वाहतूक मोठ्या प्रमाणात दिवसरात्र सुरू आहे. त्यामुळे रुईकोट ते अर्धवन रस्त्याची चाळणी झाली असून मोठमोठे खड्डे पडले आहे. यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे..
याबाबत बांधकाम विभागासह वरिष्ठ पातळीवर अनेक तक्रारी करण्यात आल्या. परंतु कंपनीचे मुजोर धोरण व संबंधित अधिकाऱ्यांशी असलेल्या मधुर संबंधामुळे अजूनही जड वाहतूक सुरू आहे. अर्धवन ते रुईकोट मार्ग जड वाहतुकीचा नसून या मार्गाने ३० ते ३५ टन कोळसा भरलेले ट्रक भरून जात आहेत. यामुळे रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहे. या मार्गावर अर्धवन, पांढरकवडा, भेंडाळा, सावळी व इतर गावातील मुले शाळा शिकण्याकरिता मुकुटबन येथे येतात. परंतु शाळकरी मुलांचे ऑटोसुद्धा चालणे कठीण झाले आहे. खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. तसेच दुचाकीच्या अपघातात वाढ झाली आहे.
बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन जड वाहतूक बंद करावी, अशी मागणी होत आहे. अन्यथा, ग्रामवासी आंदोलनाच्या तयारीत दिसत आहे. तसेच मार्की (बु.) ते मार्की (खु.) या मार्गावरील पुलावर जीवघेणा खड्डा गेल्या दोन महिन्यांपासून पडला असून, दोन्ही गावकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. .
पहिल्या पावसातच या मार्गावरील पुलावरील डांबरी कोट वाहून गेला व पुलाच्या मधोमध मोठा खड्डा पडला. यामुळे वरील दोन्ही गावातील शेतकऱ्यांना शेतात जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. बैलगाडी, दुचाकी, ऑटो या मार्गाने जाणे कठीण झाले असून अनेक दुचाकीस्वारांना अपघाताला सामोरे जावे लागले. अर्धवन ते रुईकोट व मार्की (बु) मार्की (खु.) या रस्त्याची पाहणी करून त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे..