बहुगुणी डेस्क, वणी: रस्त्याने जात असताना एका चालत्या कारने अचानक पेट घेतला. यात संपूर्ण कार जळून खाक झाली. आज बुधवारी दिनांक 20 डिसेंबर रोजी सकाळी 10.15 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. जळालेली मारोती अल्टो कार राजुरा येथील शानू शेख यांच्या मालकीची आहे. ते आज सकाळी राजु-यावरून वणीला कार दुरुस्त करण्यासाठी येत होते. दरम्यान 10.15 वाजताच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ पेट्रोलपम्प समोर त्यांना चालत्या कारमधून धूर येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कार मालक तात्काळ कारबाहेर आले. मात्र क्षणात आगीने रौद्ररुप धारण करत कार आपल्या कवेत घेतली. आग लागल्याचे कळताच रस्त्यावरील नागरीक आग विझवण्यासाठी गोळा झाले. घटनास्थळावरील लोकांनी याची माहिती तातडीने अग्निशामक दलाला दिल्याने अवघ्या 5 ते 10 मिनिटात अग्निशमनची गाडी घटनास्थळी पोहोचली. त्यांनी तात्काळ आग विझवली. आग लागल्याचे वेळीच लक्षात आल्याने आणि अग्निशामक दलाची गाडी वेळेत घटनास्थळी पोहोचल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान या ठिकाणी बघ्यांची एकच गर्दी जमा झाली होती.

Comments are closed.