माणसांना जपलं पाहिजे… व्यक्ती, नाते, भावसंबंध यावर सागर जाधव यांचे आर्टिकल…

सध्याचा काळ अत्यंत धावपळीचा आहे. श्वास घ्यायला देखील कुणाकडं उसंत नाही. पूर्वीसारखं कुणाला भेटणं होत नाही. संवाद पूर्ण होत नाहीत. निवांत गप्पा मारता येत नाहीत. सुखदुःखांची देवाण-घेवाण होत नाही. मात्र याला अपवाद काही व्यक्ती नक्कीच आहेत. जे हे सगळं आवर्जून करतात. आपल्या डोळ्यांपर्यंत आलेली आसवं दाबण्यासाठी हे इतरांचे अश्रू पुसतात. खरं पाहता वरून ते खूप आनंदी असल्याचं भासवतात. असं असलं तरी आतून ते खूप दुःखी असतात. खचलेले असतात. कोलमडून पडलेले असतात. आतून पूर्णपणे तुटलेले असतात. त्यांचा आंतरिक संघर्ष सुरूच असतो. हुंदका कंठात दाबून आपल्याला अनेकदा खोटं खोटं स्मित द्यावं लागतं. या खोट्यातलं खरं ओळखेल तोच अस्सल माणूस. अशा माणसांना आपण जपलं पाहिजे. अशांना तोडू नका. जेवढं जुळता येईल, जोडता येईल, जुळवता येईल एवढं मात्र नक्की केलं पाहिजे.

आज आपण स्वतःमध्येच खूप गुरफटलेले आहोत. गुंतलेले आहोत. अशावेळी आपण इतरांचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करत नाही. एकमेकांच्या वेदनांची कारणे शोधत नाही. बरेचदा त्यासाठी आपण असमर्थ ठरतो. इतरांकडून भावनिक मदत मिळावी, अशी आपण अपेक्षा करतो, परंतु दुसऱ्या व्यक्तीनं आपल्या दुःखाची कारणं का शोधावी? त्यावर तोडगा का काढावा? भलेही तुम्ही त्या व्यक्तीसोबत भावनिकदृष्ट्या घट्ट जोडलेले असतात. तरीसुद्धा ती व्यक्ती तुमच्यासोबत त्या अंगानं जुळलेली असेलच असं नाही. तुम्ही काही व्यक्तींना प्रामाणिकपणे समजून घेऊ शकता‌. मात्र ती व्यक्ती तुम्हाला समजून घेऊ शकेलच असंही नाही. तुमच्या वेदनांनी तो हळहळावा, असंही काही बंधनकारक नाही. ज्या व्यक्ती ही कार्यं अगदी बेमालूनपणे करतात, त्यांना मात्र कधीही सोडू नका. ते अनेकदा स्वतःच्या मोठ्या दुःखात असतात. तरीदेखील त्यांना तुमच्या छोट्याछोट्या दुःखांबद्दल कळतं, तेव्हा ते मनातून दुःखी होतात. आपलं दुःख मनाच्या एका कोपऱ्यात लपवून तुमचं दुःख निवारण्यासाठी ते प्रयत्न करतात. तुम्ही अनेकदा दुखी होता. तुम्हाला त्रास होतो. वेदना होतात. अशावेळी तुमची वेदना पलीकडल्या व्यक्तीच्या डोळ्यातून पाझरते. अशी माणसं भेटणं आजच्या काळात तरी खूप कठीण आहे. तुमच्याकडे भलेही गडगंज संपत्ती असेल. तरीदेखील आपल्या वेदनांचे अश्रू दुसऱ्यांच्या डोळ्यातून विकत घेणं शक्यच नाही.

काहीजण खूप कठोर हृदयाचे असतात. क्वचित एखादेवेळी ते रडतात देखील. मात्र ही माणसं फणसासारखी असतात. वरून काटेरी, तरीही आतून गोड. मधाळ आणि रसाळ. आपल्या जिवलगांची छोटीशी सलदेखील त्यांच्या काळजाला पीळ आणते. ही माणसं फार संवेदनशील असतात. त्याची आपण फक्त कल्पना करू शकतो. मात्र आपण तो अनुभव घेऊ शकत नाही. जर आपण हा अनुभव घेण्याची पात्रता स्वतः निर्माण करू शकलो, तर आपण कधीही त्या व्यक्ती च्या पापण्यांच्या कडा ओल्या होऊ देणार नाही.

फुलांसारखी असो की, काट्यांसारखी अशी वेगळी माणसं आपण सांभाळली पाहिजेत. कारण अशा व्यक्ती स्वतःपेक्षाही तुम्हाला जास्त सांभाळण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला वारंवार जपतात. आपल्या दुःखांना वेदनांना ती सहज नजरेआड करतात. प्रामाणिकपणे तुम्हाला सांभाळण्याचा प्रयत्न करतात. अशी माणसं जपली पाहिजेत. सांभाळली पाहिजेत.

बँक बॅलन्स, गाडी, बंगला म्हणजेच केवळ संपत्ती नव्हे. आपल्या सुखदुःखांना समजून घेणारी एक दोन व्यक्ती तरी आपल्या आयुष्यात हवीच. जर त्या तुमच्यासोबत असतीलच तर आपल्यासारखं भाग्यवान कोणीच नाही. आपल्याला काही जण खूप महत्त्व देतात. आपल्या भावना संवेदना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र कधी कधी आपल्याला असं वाटतं की, ते आपल्या आयुष्यात लुडबुड करीत आहेत. आपण त्यांच्यासोबत हेखेखोरपणे वागतो. अनेकदा त्यांना दुखावतो देखील. हे मात्र योग्य नाही, असं माझं व्यक्तिगत मत आहे. हे आपले आधारवड आहेत. वेदनांच्या रखरखत्या उन्हात सावली देणारे आहेत. नशिबानं मिळालेली ही माणसं आपण जपली पाहिजेत.

जग दिवसेंदिवस औपचारिक होत चाललंय. नात्यांची गुंफणदेखील सैल होत आहे. ती अधिक घट्ट केली पाहिजे. काही व्यक्तींना तुम्हाला गमवण्याची भीती वाटते. त्यांना समजून घ्या. जाणून घ्या. अशा व्यक्तींना नेहमी सांभाळा, अगदी स्वतःपासूनच. काहीजण आपल्यासाठी त्याग आणि समर्पण करतात. मौलिक वेळ देतात. त्यांना खूप काळजीनं जपा. अनेक भौतिक बाबींपासून आपल्याला सुख मिळतं. बरेचदा हे फार लवकरदेखील मिळतं. मिळालेल्या सुखाचा त्याग करण्यासाठी समर्पण लागतं. ही क्षमता फार कमी लोकांत असते. असे काही लोक मात्र आजही आहेत. जे केवळ तुमच्या सुखासाठी स्वतःच्या भौतिक सुखाचा त्याग करतात.

आयुष्यात प्रत्येकदा रक्ताची नाती साथ देतीलच असं नाही. काही अशीसुद्धा नाती  असतात की, जी रक्ताची नसतात. मात्र रक्ताच्या नात्यापेक्षादेखील नक्कीच कमी नसतात. कधी कधी ही नाती तर रक्ताच्या नात्यापेक्षाही महत्त्वाची ठरतात.

ही नाती टिकविणं खूप गरजेचं आहे. काही गोष्टी अत्यंत महत्चपूर्ण असतात. त्यामध्ये प्रामाणिकपणा, विश्वास आणि समजून घेण्याची पद्धत. या तीन गोष्टी जर असतील, तर कोणतंही नातं टिकून राहतं. काही व्यक्ती आत्माभिमानी असतात. स्वाभिमानी जिद्दी असतात. तरीही हे सगळं ते तुमच्यासाठी बाजूला ठेवतात. जर ती पुढील व्यक्ती आपल्याला जपत असेल, तर तिला सांभाळा. अशा माणसांना कधीच गमवू नका. आपल्या माणसांना जपा. आपल्या माणसांना जपा ‌
……………

सागर जाधव, सामाजिक कार्यकर्ते
वॉटर सप्लाय ऑफिस, वणी, जिल्हा यवतमाळ

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.