निकेश जिलठे, वणी: विदर्भ साहित्य संघाचे 66 वे साहित्य संमेलन दि.19 ते 21 जानेवारी दरम्यान येथील राम शेवाळकर परिसरात सम्पन्न होत आहे. या संमेलनाचे उदघाटन दि.19 जानेवारीला दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संम्मेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.शिरीष गोपाळ देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या प्रसंगी सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजदत्त, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, शिक्षण मंत्री विनोदजी तावडे, यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मदनभाऊ येरावार, सम्मेलनांचे पूर्वाध्यक्ष डॉ.सदानंद देशमुख हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर, कार्याध्यक्ष वामन तेलंग, सरचिटणीस विलास मानेकर व संमेलन समितीच्या आंमत्रक शुभदा फडणवीस उपस्थित राहणार आहेत.
काय आहे कार्यक्रमाची रुपरेषा ?
या संमेलनाची सुरुवात डॉ.आंबेडकर चौकातून निघणाऱ्या ग्रंथदिंडीने होणार आहे. संमेलनाच्या उदघाटना नंतर प्रा.ज्ञानेश वाकुडकर यांच्या अध्यक्षते खाली निमंत्रितांचे कवी संमेलन होणार आहे. रात्री 8 वाजता संजय भाकरे फाऊंडेशन निर्मित ‘बाप हा बापच असतो ‘ या प्रसिद्ध नाटकाची मेजवानी मिळणार आहे.
शनिवारीचे कार्यक्रम
संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची सकाळी 9 वाजता ‘संतांचे समाजभान’ या विषयावर डॉ.प्रज्ञा आपटे यांच्या अध्यक्षतेखाली व दुपारी 11 वाजता चंद्रकांत वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘शेतकऱ्यांची दैना आणि आपण सगळे’ या विषयावर परिसंवाद होणार आहे.दुपारी 1 वाजता कविवर्य विठ्ठल वाघ यांची जेष्ठ पत्रकार बाळ कुलकर्णी हे मुलाखत घेणार आहे. दुपारी 4 वाजता ‘आधुनिक तंत्रज्ञानाचे अभिजात साहित्य आणि कलेला आव्हान ‘ हा परिसंवाद अजय आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सायंकाळी 5 वाजता दीपक आसेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली दुसरे कवी संमेलन जाणार आहे. तर रात्री 8 वाजता ‘वैदर्भीय गीतगंगा’ हा कार्यक्रम सादर होणार आहे.
रविवारी कोणकोणते कार्यक्रम आहेत ?
संमेलनाच्या शेवटच्या दिवसाची सुरुवात सकाळी 10 वाजता डॉ.अभय बंग हे ‘विनोबा- शांतता कोर्ट चालू आहे’ या विषयावर बोलणार आहेत.सकाळी 11 वाजता बालाजी सुतार यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन होणार आहे.तर दुपारी 12 वाजता माध्यमांची ‘बांधिलकी आणि अभिव्यक्ती’ या विषयावर संजय आवटे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद आयोजित करण्यात आली आहे. या संमेलनाचा समारोप दुपारी 2 वाजता ना.नितीनजी गडकरी यांच्या विशेष उपस्थितीत होणार आहे.या प्रसंगी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, व माजी खासदार विजय दर्डा प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या संमेलनाच्या समारोपानंतर रात्री 8 वाजता वणी शहरातील स्थानिक शाळेतील कलावंताचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
या सम्मेलनांच्या यशस्वीततेसाठी विविध समित्यांचे गठन करून स्वागताध्यक्ष आ.संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या मार्गदर्शनात वणीकर हे संमेलन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.अशी माहिती येथील नगर वाचनालयात घेण्यात आलेल्या पत्र परिषदेत शाखाध्यक्ष प्रा.दिलीप अलोणे, संमेलन सचिव अभिजित अणे, राजाभाऊ पाथ्रडकर, सम्मेलनाचे समन्वयक गजानन कासावार, कोषाध्यक्ष प्रा.स्वानंद पुंड हे उपस्थित होते.