सालेभट्टी येथील बोगस कामाची चौकशी न केल्यास आमरण उपोषण

ग्रामस्थांनी दिला 22 ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटम

0

भास्कर राऊत, मारेगाव: सालेभट्टी ग्रामपंचायती अंतर्गत विविध योजनेत झालेल्या निकृष्ट कामाची सखोल चौकशीबाबत आता गावक-यांनी कठोर भूमिका घेतली आहे. जर चौकशी झाली नाही तर 23 ऑगस्टपासून आमरण उपोषण केले जाईल असा इशारा गावक-यांनी दिला आहे. सालेभट्टी व वरुड या दोन्ही गावात मागील पाच वर्षामध्ये विविध विकासकामे निकृष्ट दर्जाची झाली असून या कामात भ्रष्टाचार झाल्यानेच कामे थातुरमातुर आणि अर्धवट झाल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे. याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले होते. मात्र चौकशी थंडबस्त्यात गेल्याने गावकरी आक्रमक झाले आहे व त्यांनी याबाबत गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे.

गट ग्रामपंचायत वरुड सालेभट्टी पेसा अंतर्गत येते. गेल्या पाच वर्षात ग्रामविकासाच्या विविध योजनेअंतर्गत वरुड-सालेभट्टी या गटग्रामपंचायत क्षेत्रात नाली, शौचालय, सिमेंट रस्ता, स्मशानभूमी सौंदर्यीकरण, शेड बांधकाम, पाणी पुरवठा इत्यादी कामे झाली आहेत. पण यातील अनेक कामे हे अर्धवट किंवा निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा गावक-यांचा आरोप आहे. ठेकेदारांनी काम अर्धवट केल्यावरही त्यांची बिले काढल्याचा आरोपही तक्रारदारांचा आहे. या भ्रष्ट कारभाराला ग्रामपंचायत प्रशासनासह वरीष्ठ अधिकारी, सचिव आणि ठेकेदार हे प्रत्यक्ष जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

‘वणी बहुगुणी’कडून बोगस कामांचा पर्दाफाश
सालेभट्टी गावात विविध योजनेअंतर्गत झालेल्या निकृष्ट दर्जाचा कामाचा पर्दाफाश ‘वणी बहुगुणी’ने केला होता. वणी बहुगुणीमध्ये अर्धवट शौचालयाची तसेच नालीच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची बातमी येताच ठेकेदाराने या कामाची डागडुजी केली होती. असे अनेक निकृष्ट दर्जाचे व बोगस कामे या गावात झाल्याचा तक्रारदारांचा आरोप आहे.

हेच ते बोगस काम झालेले शौचालय

गेल्या महिन्यात याबाबत आमदार तसेच विरिष्ठ अधिका-यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र त्याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे तक्रारदारांनी 22 ऑगस्टपर्यंत अल्टीमेटम दिला असून त्यानंतर आमरण उपोषण केले जाईल असा इशारा दिला आहे. याबाबत दिलेल्या निवेदनावर वरुड-सालेभट्टी येथील ग्रामस्थांच्या स्वाक्षरी आहेत.

हे देखील वाचा:

घोडदरा-शिवनाळा शिवारात आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह

Leave A Reply

Your email address will not be published.