सूत्रसंचालन कार्यशाळा आणि ‘‘जगू कविता: बघू कविता’’ उत्साहात

सुनील इंदुवामन ठाकरे यांच्यासह विद्यार्थी रंगले कवितांच्या विश्वात, घेतले सूत्रसंचालनाचे धडे

0

बहुगुणी डेस्क, अचलपूरः स्थानिक श्री समर्थ इंस्टिट्यूट ऑफ एज्युकेशनद्वारा संचालित स्व. छगनलाल मुलजीभाई कढी कला महाविद्यालय येथे सुनील इंदुवामन ठाकरे यांचा ‘‘जगू कविता: बघू कविता’’ कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या भरगच्च प्रतिसादात झाला. सोबत त्यांची सूत्रसंचालन कार्यशाळादेखील झाली. संस्थेचे सचिव श्रीपाद तारे यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन कॉलेजच्या मराठी भाषा व वाङ् मय मंडळाने केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रमोद बावणे होते. विचारपीठावर मराठी विभाग प्रमुख प्रा. नरेंद्र पाखरे, डॉ. गजानन बिजवे, डॉ. रविंद्र सावरकर, प्रा. गौतम खोब्रागडे, डॉ. सरिता इंगळे, डॉ. संजीव इंगळे, डॉ. शुभांगी सोनार, प्रा. अविनाश गायगोले उपस्थित होते. प्रशिक्षकांच्या परिचयासह प्रास्ताविक भूमिका डॉ. काशीनाथ बऱ्हाटे यांनी मांडली. संचालन अंजली खंडेलवाल हिने केले तर आभार पायल डांगे या विद्यार्थीनीने मानले.

प्रास्ताविक करताना प्रा. डॉ. काशीनाथ बऱ्हाटे

 

यावेळी विद्यार्थ्यांसोबत प्रात्यक्षिकांसह सुनील इंदुवामन ठाकरे यांनी कविता व सूत्रसंचालन हा विषय घेतला. यावेळी ते म्हणाले की, इतर सर्व प्राण्यांपेक्षा मानवालाच अधिक स्पष्ट आणि पूर्णपणे व्यक्त होता येते. हा व्यक्त होण्याचा गुण म्हणजे एक नैसर्गिक देण आहे. ही देण विकसित केली तर ती कला म्हणून प्रभावीपणे आपण सादर करू शकतो. बोली, भाषा, आवाजातील चढउतार, शब्दांचे योग्य उच्चार, प्रमाणभाषा लेखन अशा अनेक विषयावंर त्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. कार्यशाळेत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सहभागी करून घेऊन काही प्रात्यक्षिके त्यांनी करवून घेतली.

सूत्रसंचालन कार्यशाळा आणि “जगू कविता : बघू कविता” कार्यक्रमाचा आस्वाद घेताना विद्यार्थी

दोन सत्रांत चाललेल्या या कार्यक्रमात ‘‘जगू कविता: बघू कविता’’ ही मैफलदेखील रंगली. तुमच्या आमच्या जगण्यातली कविता या विषयांतर्गत सुनील इंदुवामन ठाकरे यांनी अनेक कविंच्या कवितांचे सादरीकरण केले. काव्यवाचनाची कला या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली.

अध्यक्षीय भाषणात डॉ. प्रमोद बावणे यांनी ठाकरे यांच्या कार्यशाळेबद्दल समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांमधील भाषेचा न्यूनगंड दूर होण्यासाठी तसेच सभाधीटपणा वाढण्यासाठी या कार्यशाळेचा उपयोग विद्यार्थ्यांना होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. विषयाचा आवाका बघता केवळ तीन तास कमी पडतात. त्यामुळे लवकरच निवडक विद्यार्थ्यांसाठी तीन ते पाच दिवसांची सविस्तर कार्यशाळा ते घेणार असल्याचा शब्द दिला. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

Comments
Loading...
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!