वणीच्या समीर पत्तीवारची उत्तुंग भरारी
बुक किपिंग अँड अकाउंटन्सी विषयात राज्यात पहिला
तालुका प्रतिनिधी, वणी: मानवी जीवनात सकारात्मकतेला अनन्य साधारण महत्त्व आहे. असं म्हणतात की कठीण परिस्थितीलाही जो सकारात्मक घेतो तो यशस्वी होतो. परिस्थिती कितीही बिकट असो किंवा कितीही संकटं येवोत सकारत्मकतेला संकट कधीच हरवू शकत नाही. कठोर व सातत्यपूर्ण प्रयत्नाने त्यावर मात करता येते. कितीही बिकट परिस्थिती निर्माण होऊ देत, शेवटच्या श्वासापर्यंत त्यातून मार्ग काढण्यासाठी धडपडणारा शेवटी जिंकतोच. त्यामुळेच सकारत्मकता याला यशाची गुरुकिल्ली देखील संबोधले जाते. असंच काहीसं संघर्षमय जीवनाला न डगमगता बारावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन करणाऱ्या आर्थिक परिस्थितीने गरीब मात्र मनाने श्रीमंत असणाऱ्या समीरची ही यशोगाथा. तो संपूर्ण राज्यात बुक किपिंग अँड अकाउंटन्सी विषयात राज्यात पहिला आला आहे.
समीर प्रमोद पत्तीवार असं या ध्येयवेड्या तरुणांच पूर्ण नावं आहे. समीरच्या वडिलांचे मोठ्या कमानीजवळ पानविक्रीचे दुकान होते. वडिलांच्या अकस्मात निधनानंतर तो आई सोबत वणीच्या गुरूनगर वार्डात राहतो. आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने आईला मदत म्हणून घर चालविण्यासाठी खासगीत मिळेल ते काम करतो. मात्र कुटूंब चालविण्यासाठी आईला आर्थिक मदत म्हणून काम करताना त्याने कधीही अभ्यासाकडे दुर्लक्ष केले नाही.
बुद्धीने अत्यंत चौकस असलेल्या समीरच शिक्षक जैन ले आउट मधील गुरुपीठ इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये झालं. खरं पाहता या शाळेतूनच त्याच्या शिक्षणाचा खरा पाया रचला गेला. दहावीची परीक्षा जनता विद्यालयातून उत्तीर्ण झाल्यावर अकरावी कॉमर्स करीता वणी पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश घेतला.
या विद्यालयातून याच वर्षी त्याने बारावीची परीक्षा ८५•८५ टक्के गुणांनी उत्तीर्ण केली. नव्हे तर बुक किपिंग अँड अकाउंटन्सी विषयात १०० पैकी पूर्ण गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला. परंतु त्याने आपल्या यशाचा कुठेच गाजावाजा केला नाही. हाच त्याच्या मनाचा मोठेपणा.
समीरच्या यशाबद्दल माहिती मिळताच राष्ट्रमाता बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारा संचालित गुरुपीठ इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये संस्थेचे सचिव अरुण खोकले, मुख्याध्यापिका आशा खोकले, सदस्य संकेत खोकले, शुभम खोकले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी शिक्षिका किरण महेश खडतकर, रंजना प्रवीण झाडे उपस्थित होत्या. लॉकडाऊनच्या काळात समीरचा व्यवसाय बंद होता. यावेळी संस्था सचिवांनी समीरच्या कुटूंबाला धान्य आणि आर्थिक मदत देऊन धीर दिला होता. सदर संस्थेत शिक्षण घेणाऱ्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने सदैव मदतीचा हात दिला जातो.