जितेंद्र कोठारी, वणी: जेसीबीच्या मदतीने फर्निचर दुकान उदध्वस्त करणारा आरोपी समीर परवेज रंगरेज कडून पोलिसांनी तलवार जप्त केली. त्यामुळे आरोपीवर शस्त्र अधिनियम कलम 4 (25) अन्वये गुन्हात वाढ करण्यात आली. आरोपींकडे शस्त्र सापडल्याने पोलिसांनी पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती. त्यावरून न्यायालयाने सर्व आरोपींना आणखी 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सोमवारी सर्व आरोपींवर दरोड्याची कलम 397 जोडण्यात आली होती.
11 ऑक्टोबर बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास माळीपूरा स्थित पंकज भंडारी यांचे दुकान जेसीबीने समीर रंगरेज यांनी पाडले होते. यात भंडारी यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. सदर जागा ही समीर रंगरेज यांनी विकत घेतली असून जागा खाली करण्यावरून समीर रंगरेज व दुकान चालक भंडारी यांच्यात वाद होता. सदर प्रकरण हे न्यायप्रविष्ट होते. मात्र न्यायालयाचा निकाल येण्याआधीच समीर याने कुठलीही नोटीस न देता परस्पर जेसीबीने दुकान तोडले. यामध्ये दुकानाचे जवळपास 20 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा भंडारी यांनी केला होता.
या प्रकरणी वणी पोलिसात कलम 457, 380, 427 नुसार गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तात्काळ जेसीबीचा चालक विनोद सुधाकर अवताडे व वाहक रुपेश उद्धव आत्राम यांना अटक केली होती. परंतु मुख्य आरोपी समीर रंगरेज फरार होता. त्यानंतर शुक्रवारी रात्री पोलिसांनी छिंदवाडा येथून समीर रंगरेज, जावेद रंगरेज, सोनू रंगरेज या तिघांना अटक केली होती. शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
त्यानंतर सोमवारी दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सर्व आरोपींवर दरोड्याची कलम 397 जोडण्यात आली होती. त्यानंतर शस्त्र अधिनियम कलम 4(25) अन्वये गुन्हात वाढ करण्यात आली. दरम्यान समीर रंगरेज यांच्या वडिलांनी हा संपत्तीचा वाद असून याला धार्मिक वळण देऊ नये असे आवाहन केले होते.
Comments are closed.