सुशील ओझा, झरी: तालुक्यातील नदीपात्रातून रेतीचे उत्खनन करून तेलंगणात वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर महसूल विभागाने पकडून जप्त केले आहे. सुमारे १४ लाख ७ हजारांचा मुद्देमाल जप्त करून तस्करांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. .
पाटण परिसरातील दुर्भा नदीच्या पात्रातून रेतीची चोरी होत असल्याची माहिती मंडळ अधिकारी महेंद्र देशपांडे व तलाठी बाळकृष्ण येरमे यांना मिळाली. त्यांनी सापळा रचून दुर्भा शिवारात ट्रॅक्टर क्र एपी ०१, एक्स ३७८९, टी एस २० टी १२७४, एपी १ वी ०७३१, टी एस ०१ व्हीए ९४८० पकडले. त्यांच्याकडून अडीच ब्रास रेती किंमत ७ हजार १२५ व ४ ट्रॅक्टरची किंमत १४ लाख असा एकूण १४ लाख ७ हजार १२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अशोक रामलू गुमजलवार, प्रशांत विराज मालतवार, नरसीमलू रामलू एलगटीवार, प्रवीण पोशेट्टी बोलकुंटलवार, पोशेट्टी लिंगन्ना बोलकुंटलवार, हरीश हुशेन्ना लष्कटलावार, राजरेड्डी भुमन्ना हलचेट्टीवार सर्व रा. आदिलाबाद यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल केला. अधिक तपास ठाणेदार शिवाजी लष्करे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार श्यामसुंदर रायके करीत आहे.
तालुक्यात रेती तस्करीचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे महसूल विभागाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. तालुक्यातील हिरापूर, दुर्भा, येडसी, मुंजाळा, परसोडासह इतर नदीपात्रातून खुलेआम रेती तस्करी सुरू आहे. मात्र राजकीय दबावातून कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे. बहूतांश रेती तस्कर राजकीय क्षेत्रात विविध पदांवर आहे. त्यामुळे कारवाई होत नसल्याची ओरड आहे.