जमीन परस्पर विकल्याचा आरोप बिनबुडाचा – संजय देरकर

आरोप राजकीय हेतूने प्रेरीत, आरोपकर्त्याचा बोलविता धनी वेगळाच

विवेक तोटेवार, वणी: सद्गुरू जगन्नाथ महाराज संस्थान वेगावच्या नावाने नोंदणीकृत असलेली झरी जामणी तालुक्यातील रुईकोट येथील शेत जमीन मे. बी.एस. इस्पात लि. या कोळसा खाणी करीता परस्पर विकल्याचा आरोप बंडू देवाळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. मात्र हा आरोप धादांत खोटा असून स्वच्छ प्रतिमेला दाग करण्याचा हा प्रकार आहे. यामागे राजकीय षडयंत्र असून त्याचा बोलविता धनी कुणी तरी वेगळाच आहे, असे स्पष्टीकरण संजय देरकर यांनी पत्रकार परिषदेतून दिले. गुरुवारी दु. बंडू देवाळकर या भक्ताने विविध आरोप संजय देरकर यांच्यावर केले होते. मात्र हे आरोप काही पुरावे जोडून संजय देरकर यांनी खोडून काढले. विशेष म्हणजे दान केलेल्या शेत जमिनीचे ट्रस्टी म्हणून मंदावार कुटुंबातील सदस्यच जबादारी पार पाडत होते. असा उल्लेखही देरकर यांनी केला.

झरी जामणी तालुक्यातील रुईकोट येथील जगन्नाथ महाराज संस्थान वेगावच्या नावे रजिस्टर असलेली ही पाच एकर शेत जमीन सन १९७४ साली रामलू उर्फ रामन्ना बकन्नाजी मंदावार यांनी वणी रजिस्टर कार्यालयात बक्षिस पत्राद्वारे संस्थानला दान दिली. त्यानंतर १९८६ साली संस्थानच्या वतीने धर्मदाय आयुक्ताकडे या शेत जमिनीची नोंदणी करण्यात आली. १९८६ पासून जगन्नाथ महाराज संस्थान वेगावच्या नावे ही शेत जमीन रजिस्टर असून तशी सातबाऱ्यावर नोंद देखील आहे.

दरम्यान मे. बी. एस. इस्पात लि. या कंपनीने कोळसाखानी करीता येथील शेत जमिनी अधिग्रहित केल्या. मात्र सर्वे नंबर ४९/५ मधील २.२ हेक्टर असलेली ही शेत जमीन जगन्नाथ महाराज संस्थानच्या नावे रजिस्टर असल्याने ती अधिग्रहित होणे बाकी होते. त्यामुळे कोळसा कंपनी वारंवार या शेत जमिनी बाबत पाठपुरावा करीत होती. त्याकरिता २५ जानेवारी २०२४ रोजी धर्मदाय आयुक्त अमरावती यांच्याकडे या शेत जमिनीच्या विक्री बाबत परवानगी मिळण्याकरिता देवस्थान समिती कडून अर्ज सादर करण्यात आला. त्यानुसार १९ सप्टेंबर २०२४ रोजी शेत जमीन विक्री करण्याकरिता धर्मादाय आयुक्तांकडून परवानगी मिळाली. ही सर्व प्रक्रिया नियमानुसार करण्यात आली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

शेत जमीन खरेदी विक्रीचे सर्व व्यवहारही पारदर्शकपणे झाले आहेत. जगन्नाथ महाराज संस्थानच्या खात्यातच ही सर्व रक्कम जमा होणार आहे. त्यातून दुसरीकडे शेत जमीन घेऊन सद्गुरू जगन्नाथ महाराज यांचं देवस्थान बांधण्यात येणार आहे. मंदावार यांनी दान केलेल्या शेत जमिनीचे ट्रस्टी म्हणून मंदावार कुटुंबातील सदस्यच जबादारी पार पाडत होते. त्यामुळे जगन्नाथ महाराज संस्थान वेगावच्या नावे रजिस्टर असलेली शेत जमीन परस्पर विक्री केल्याचा माझ्यावर करण्यात आलेला आरोप धादांत खोटा आहे, असे स्पष्टीकरण संजय देरकर यांनी पत्रकार परिषदेतून दिले.

Comments are closed.