संजय देरकर: वैयक्तिक ताकदीला मिळाली पक्षाची साथ !

यंदाच्या निवडणुकीत देरकर यांचा दिसणार करिष्मा?

निकेश जिलठे, वणी: संजय देरकर यांनी आतापर्यंत दोनदा अपक्ष तर दोनदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवली. या सर्व निवडणुका देरकर यांनी वैयक्तिक ताकदीवर लढल्या. यात त्यांना पक्षाची मतांची फारशी रसद किंवा साथ मिळाली नाही. 2009 च्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष असूनही 40 हजारांपेक्षा अधिक मते घेतली होती. तर 2019 च्या निवडणुकीत त्यांनी 25 हजारांपेक्षा अधिक मतदान घेतले. मतदारसंघात देरकर यांनी वेळोवेळी मतदारसंघात त्यांची वैयक्तिक ताकद दाखवून दिली. मात्र ही ताकद दरवेळी कमी पडत होती. यावेळी त्यांच्या वैयक्तिक ताकदीला शिवसेना सारख्या मजबूत पक्षाची तसेच महाविकास आघाडीची साथ मिळाली आहे. त्यामुळे यंदा देरकरांचा करिष्मा दिसणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

1999 च्या निवडणुकीत संजय देरकर हे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट दिले होते. मात्र त्यावेळी त्यांना मतविभाजनाचा फटका बसला. त्यानंतर 2004 च्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची आघाडी (युती) झाली. या आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली. त्यावेळी संजय देरकर यांनी निवडणूक लढणे टाळले. त्याचा फायदा शिवसेनेला झाला व विश्वास नांदेकर हे विजयी झाले.

2009 च्या निवडणुकीत 40 हजार पार
2009 च्या विधानसभा निवडणुकीत संजय देरकर यांनी अपक्ष निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी 41,330 मतदान घेतले. वणी विधानसभा क्षेत्राच्या निवडणुकीच्या इतिहासात अपक्ष उमेदवाराने घेतलेले हे सर्वाधिक मतदान मानले गेले. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी कडून उभे राहत 31 पेक्षा अधिक मतं घेतली. 2019 च्या निवडणुकीत अनेक दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. देरकर यांनी पुन्हा एकदा अपक्ष उभे राहत आपली ताकद दाखवली. दिग्गज उमेदवारांच्या भाऊगर्दीत त्यांनी 25 हजारांपेक्षाही अधिक मतं घेतली.

वैयक्तिक ताकदीला मिळाली पक्षाची साथ !
तिकीट वाटप करताना शिवसेना पक्षश्रेष्ठींनी वैयक्तिक ताकदीचा निकषच डोळ्यासमोर ठेवला होता. संजय देरकर यांचे वैयक्तिक मतं, त्यला शिवसेना, काँग्रेस व मित्रपक्षाची साथ मिळाल्यास वणी विधानसभा क्षेत्रात त्यांचे मताधिक्य लाखांपेक्षा अधिक जाईल व विजय मिळणे सोपे राहील, असे गणित मांडले गेले. हेच गणित आता या निवडणुकीत दिसणार का? याकडे सर्व मतदारांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेने 20 वर्षानंतर फिरवली भाकरी, संजय देरकर उमेदवार

Comments are closed.