शिवसेनेने 20 वर्षानंतर फिरवली भाकरी, संजय देरकर उमेदवार

काँग्रेसचा पारंपरिक गड आला शिवसेनेच्या वाटेला

निकेश जिलठे, वणी: रविवारी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर सर्वांचे लक्ष महाविकास आघाडीची जागा कुणाला सुटणार याकडे लागले होते. यात अखेर शिवसेना (उबाठा) पक्षाने बाजी मारली. संजय देरकर यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी विश्वास टाकला आहे. विशेष म्हणजे तब्बल 20 वर्षानंतर शिवसेनेने भाकरी फिरवली आहे. सध्या भाजपचे उमेदवार आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, शिवसेना (उबाठा) संजय देरकर व मनसेचे राजू उंबरकर हे तीन तुल्यबळ उमेदवार निवडणुकीत उभे राहणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र तिकीट न मिळाल्याने आता शिवसेना किंवा काँग्रेसमधून कोणी बंडखोरी तर करणार नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एक आठवडा आधीच निरोप?
एक आठवडयाआधी संजय देरकर यांना पक्षश्रेष्ठींनी निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा निरोप दिला होता, अशी माहिती आहे. मात्र दरम्यानच्या काळात तिकीट उबाठा गटात गेल्याचे कळताच काँग्रेसचे संजय खाडे यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मदतीने फिल्डिंग लावली होती. तर माजी आमदार वामनराव कासावार हे देखील दिल्लीत तळ ठोकून होते. तिकीट काँग्रेसला जाणार नाही, किंवा गेली तरी ते तिकीटाच्या रेसमध्ये नाही, हे कळल्यावर ते दिल्लीतून परत आले. मात्र संजय खाडे हे शेवटपर्यंत तिकीटासाठी प्रयत्न करीत होते. आधी दिल्ली व नंतर मुंबईत ते तळ ठोकून होते. मात्र विदर्भाचा तिकीटाचा तिढा सुटला व वणीची तिकीट उबाठाच्या क्वोट्यात गेली.

उबाठाने 20 वर्षांनंतर फिरवली भाकरी
शिवसेना-भाजप युती झाल्यापासून वणी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाटेला आहे. 1989 साली दे.मा. ठावरी. त्यानंतर सलग दोन टर्म विनोद मोहितकर यांना शिवसेनेने तिकीट दिले.  2004 मध्ये शिवसेनेने भाकरी फिरवत मोहीतकर यांच्या ऐवजी विश्वास नांदेकर यांना उमेदवारी दिली. त्यानंतर सलग 3 टर्म विश्वास नांदेकर हे शिवसेनेचे उमेदवार होते. 2019 मध्ये ही तिकीट भाजपच्या क्वोट्यात गेली. त्यावेळी नांदेकर यांनी बंडखोरी केली. त्यानंतर महाविकास आघाडी झाल्याने यावेळी 2024 मध्ये ही जागा उबाठाच्या क्वोट्यात आली. मात्र यावेळी पक्षाने भाकरी फिरवत संजय देरकर यांच्यावर विश्वास टाकला आहे.

Comments are closed.