जयतु संस्कृतम् ! जयतु भारतम् ! घोषांनी वणीची प्रभात रंगली

संस्कृतसप्ताहात भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी

0

बहुगुणी डेस्क, वणी: जयतु संस्कृतम् ! जयतु भारतम् ! वंदे मातरम् ! अस्माकम् भाषा संस्कृत भाषा! वद वद वद संस्कृतम् ! भण भण भण संस्कृतम् ! अशा अत्यंत आकर्षक, लक्षवेधक घोषणांनी आणि कर्णमधुर संस्कृत गीतांनी वणीची पहाट मंगलमय झाली. निमित्त होते संस्कृत भारती, जैताई देवस्थान आणि लोकमान्य टिळक महाविद्यालयाचा संस्कृत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही विविध आगळ्यावेगळ्या उपक्रमांनी संपन्न होणाऱ्या संस्कृत सप्ताहाचे एक वैशिष्ट्यपूर्ण आकर्षण रूपात वणीनगरीत निघालेली संस्कृत प्रभात यात्रा.

शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयाच्या प्रांगणात विद्यावाचस्पती स्वानंद पुंड यांनी श्रीफल वाढवून आरंभ झालेली ही यात्रा आंबेडकर चौक, टिळक चौक, बसस्थानक मार्गाने जैताई मंदिर प्रांगणात संपन्न झाली. चौकाचौकात आणि मार्गातही विद्यार्थ्यांनी विविध संस्कृत सुभाषिते आणि संस्कृत गीतांनी वातावरण प्रफुल्लित केले.

प्रणीता भाकरे, रेणुका अणे, गायत्री महालक्ष्मे, वैशाली देशमुख,ज्योती शिरभये, कोमल बोबडे, प्रशान्त भाकरे, महेश पुंड, अतुल गोंडे, आनंद बनसोड या मान्यवरांसह लोकमान्य टिळक महाविद्यालय, शिक्षण प्रसारक विद्यालय तथा विवेकानंद विद्यालयाच्या सुमारे साडेतीनशे विद्यार्थ्यांनी या प्रभात फेरीत सहभाग नोंदवला. चौकाचौकात आणि मार्गावर वणीकर जनतेने उपक्रमाला दिलेली पसंती लक्षणीय होती.

बालकांच्या मनी रुजले संस्कृतचे बीज

संस्कृतचा प्रचार आणि प्रसारासाठी कटिबद्ध संस्कृत भारती, जैताई देवस्थान आणि लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या संस्कृत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या संस्कृत सप्ताहाच्या निमित्ताने विविध वयोगटाकरिता वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

यामध्ये संस्कृत सुभाषित लेखन स्पर्धेत ४५ विद्यार्थ्यांनी तर संस्कृत शुद्धलेखन स्पर्धेत ६५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला .यावेळी संस्कृत सरला, सुगमा इत्यादी परीक्षांच्या नवीन वर्गाचा आरंभ करण्यात आला तथा मागील वर्षीच्या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

Comments
Loading...