वणीतील व्यक्तीचा नागपूर येथे संशयास्पदरित्या आढळला मृतदेह

दोन दिवसांपासून होते बेपत्ता, परिसरात हळहळ

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील जुने कॉटन मार्केट येथील रहिवाशी असलेले संतोष गोमकर यांचा आज सकाळी नागपूर जवळील कोराडी येथे रेल्वे रुळालगत संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आला. मंगळवारी दिनांक 8 मार्च रात्री ते घरून ड्युटीसाठी गेले होते. सकाळी ते घरी येणे अपेक्षीत होते. मात्र ते घरी न परतल्याने संध्याकाळपासून त्यांचा शोध सुरू होता. अखेर दोन दिवसांनी त्याचा कोराडी येथे संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आला.

प्राप्त माहितीनुसार संतोष गोमकर (वय 45) हे जुने कॉटन मार्केट परिसरात राहत होते. ते एका खासगी रेल्वे सायडिंगवर कंत्राटी कामगार म्हणून काम करीत होते. ते नाईट शिफ्टमध्ये काम करायचे. मंगळवारी दिनांक 8 मार्च रोजी रात्री ते घरून कामावर गेले होते. सायडिंगवरील हजेरी बुकात त्यांच्या येण्याची नोंदही आहे. मात्र दुस-या दिवशी सकाळी ते घरी पोहोचले नाही. संध्याकाळी ते घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी कार्यालयात फोन केला असता संतोषचा मोबाईल व दुचाकी सायडिंगवरच असल्याची माहिती त्यांना मिळाली.

आज शुक्रवारी दिनांक 11 मार्च रोजी नागपूर येथील कोराडी परिसरातील रेल्वे रुळानजिक कोळश्याच्या ढिगा-याजवळ एक संशयास्पद मृतदेह आढळून आला. याची तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. ओळख पटवण्यासाठी मृतकाच्या खिशातील कागदपत्र तपासले असता त्याचा संबंध वणीशी जुळून असल्याचे आढळून आले. त्यावरून कोराडी पोलिसांनी संतोषच्या कुटुंबीयांशी वणीत संपर्क साधला. दरम्यान पोलिसांना संतोष बेपत्ता असल्याची माहिती मिळाली.

ओळख पटवण्यासाठी संतोषच्या कुटुंबीयांना नागपूर येथे बोलवण्यात आले. सदर मृतदेह हा संतोषचाच असल्याची खात्री पटली. संतोषचा मृतदेह नागपूर येथील मेयो हॉस्पिटलमध्ये उत्तरिय तपासणीसाठी पाठवण्यात आला. उत्तरिय तपासणीनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. सध्या संतोषचा मृतदेह नागपूरहून वणीला आणण्याची प्रक्रिया सुरू होती.

संतोष नागपूरमध्ये गेला कसा?
संतोषचा मोबाईल व दुचाकी ही वणीत रेल्वे सायडिंगवर असल्याची माहिती आहे. मात्र तिथून तो नागपूरला कसा गेला याचे उत्तर अद्याप मिळू शकले नाही. वणीतील रेल्वे सायडिंगवरून जाणा-या डब्यातून तर संतोष नागपूरला गेला नाही असाही एक अंदाज बांधला जात आहे. सदर प्रकरणाचा तपास कोराडी पोलीस करीत आहे. तपासाअंती मृत्यूचे खरे कारण व तो नागपूरला कसा गेला हे स्पष्ट होईल.

संतोष हा शहरातील अनेक सामाजिक उपक्रमात सहभागी असायचा. राजकीय क्षेत्रात त्यांचा वावर असायचा. त्याच्या मृत्यूची बातमी वणी शहरात मिळताच शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.