संतोष गोमकर संशयास्पद मृत्यू प्रकरणी रेल्वे महानिरिक्षकांची भेट

तपास जलदगतीने होण्यासाठी डॉ. महेंद्र लोढा यांचे नागपूरला जाऊन निवेदन

जितेंद्र कोठारी, वणी: संतोष गोमकर यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी तीन आठवड्यापेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. मात्र प्रकरणाचा तपास धिम्या गतीने होत आहे. त्यामुळे प्रकरणाचा त्वरित तपास करून संतोष गोमकर यांना न्याय द्यावा अशी मागणी काँग्रेसचे नेते डॉ. महेंद्र लोढा यांनी केली आहे. याबाबत त्यांनी नागपूर येथे रेल्वे महानिरिक्षक एम राजकुमार यांची भेट घेतली. या प्रकरणी त्यांच्याशी चर्चा करून डॉ. लोढा यांनी तपास जलदगतीने करावा अशी मागणी निवेदन देऊन केली आहे. आधी हे प्रकरण कोराडी पोलिसांनी वणी पोलिसांकडे वर्ग केले होते. आता हे प्रकरण रेल्वे पोलिसांकडे वर्ग झाले आहे. त्यामुळे तपासात दिरंगाई होत आहे. याआधी डॉ. महेंद्र लोढा यांच्या नेतृ्त्वात काँग्रेसतर्फे उपविभागीय अधिकारी व कंपनी व्यवस्थापनाला निवेदन देण्यात आले. यात त्यांनी संतोषच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत करण्याची मागणी केली होती.   

संतोष रामदासराव गोमकर हे महा मिनरल माईनिंग प्रा. लि. या कंपनीतील पिंपळगाव/वणी प्लान्ट येथे साईट सुपरवायजर या पदावर कार्यरत होते. दिनांक 8 रोजी संतोष यांची नाईट शिफ्ट होती. रात्री संतोष ड्युटीवर गेले होते. मात्र दुस-या दिवशी ते घरी परतले नाही. दुस-या दिवशी कोराडी रेल्वे साईडिंग येथे त्यांचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे त्यांचा मोबाईल व मोटारसायकल या वस्तू वणी येथील कार्यालयातच होत्या. त्यामुळे हा प्रकार घातपात असून त्याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

संतोष हे घरातील कर्ते पुरुष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी आहे. घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने संतोष यांचे कुटुंबीय उघड्यावर पडले आहे. त्यांची हत्या ड्युटी झाली आहे. शिवाय यास कंपनीची सुरक्षा व्यवस्था जबाबदार असल्याने कंपनीने एका आठवड्याच्या आत नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी कंपनीला व्यवस्थापनाला दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. जर कंपनीने एका आठवड्यात आर्थिक मदत न दिल्यास काँग्रेसतर्फे मोठे आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा काँग्रेस पक्षातर्फे डॉ महेंद्र लोढा यांनी दिला आहे. 

हे देखील वाचा:

शाळेत जाणा-या शिक्षकावर काळाचा घाला, ट्रकने चिरडल्याने जागीच मृत्यू

 

Comments are closed.