सरपंचाच्या अंगावर आला सुसाट ट्रक
रात्री घडले थरारनाट्य, संतप्त गावक-यांचा रात्री रास्ता रोको
सुशील ओझा, झरी: दारू पिऊन असलेल्या ट्रक चालकाने काल मंगळवारी रात्री ८ वाजताच्या दरम्यान रस्त्याने जाणा-या सरपंचाच्या अंगावर ट्रक नेल्याने वेगळेच नाट्य घडले. ही घटना रुईकोट ते अर्धवन मार्गावरील आमराई जवळ घडली. सरपंच यांच्या अंगावर सुसाट वेगाने ट्रक आणल्याने ते वीस फूट रोडच्या खाली दुचाकी घेऊन पडले. ही घटना माहिती होताच संतप्त झालेल्या लोकांनी रात्री चार तास रास्ता रोको केला.
भेंडाळ्याचे सरपंच लीनेश सातपुते हे मंगळवारी कामानिमित्त मुकुटबनला गेले होते. काम आटपून संध्याकाळी ते भेंडाळ्याला घरी परतत होते. रुईकोट ते अर्धवन या रस्त्याच्या मध्ये आमराईजवळ कोळसा भरून जाणारा एक सुसाट ट्रक त्यांच्या अंगावर आला. त्यामुळे त्यांची गाडी रस्त्याच्या 20 फूट खाली गेली. यात सुदैवाने ते बचावले व त्यांना इजा कोणतीही इजा झाली नाही.
गावात येताच त्यांनी ही सर्व घटना गावक-यांना सांगितले. यामुळे सर्व गावकरी संतापले. त्यांनी रुईकोट फाट्याजवळ चक्का जाम केला. कोळश्याच्या ट्रक अडवून त्यांनी संपूर्ण रस्ता रात्री 12 वाजेपर्यंत रस्ता बंद केला. त्यावेळी सरपंच लीनेश सातपुते, उपसरपंच तुकाराम आडे, सुरेश मानकर, श्रीकांत चामाटे, गजानन डोहे यांच्यासह ७० ते ८० महिला पुरुष होते.
संतप्त झालेल्या गावक-यांनी चक्काजाम केल्याची माहिती ठाणेदार जगदाळे यांना मिळाली. त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गावकर्यांची समजूत काढून त्यांना चक्का जाम आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. अखेर गावक-यांनी चक्का जाम आंदोलन मागे घेतले. यामुळे सुमारे चार तास रस्ता बंद होता.
गावक-यांचा राग दुस-या दिवशीही शांत झाला नव्हता. त्यांनी आज बुधवारी २६ सप्टेंबरला तहसील कार्यालयात कोळसा कंपनीचे वैद्य व पावडे तसेच रुईकोट, भेंडाळा येथील सरपंच उपसरपंच, ठाणेदार व पत्रकार यांच्या उपस्थितीत तहसीलदार अश्विनी जाधव यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी गावक-यांनी विविध मागण्यांवर तहसिलदार यांच्याशी चर्चा केली.
रुईकोट गावाजवळ स्पीड ब्रेकर लावणे, ट्रकवरील नंबर प्लेट स्पष्ट लावावी. ट्रक चालक दारू पिऊन आहे वाहन चालवतो का याची खात्री करणे, रस्त्याचे त्वरित रुंदीकरण करावे. अशी मागणी केली. कंपणीने रस्ता रुंदीकरण व दुरुस्ती लवकर करून देणार असल्याचे कबूल केले. शिवाय त्याप्रकारची तरतूदही करण्यात आल्याचे सांगितले. तरी सदर रस्ता दुरुस्तीचे काम केव्हा सुरू होणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
तालुक्यातील पांढरकवडा(लहान) येथे टॉपवार्थ नामक कोळसा खदाण असून या खदाणीतून कोळश्याची जड वाहतूक जोमात सुरू आहे. अर्धवन ते रुईकोट रस्त्याची संपूर्ण चाळणी होऊन खड्डेमय झाला आहे. खराब झालेल्या रस्ता दुरुस्तीकरिता अनेक तक्रारी करण्यात आल्यात. मात्र कोळसा कंपनीकडून कोनतीही दखल घेण्यात आली नाही. आरटीओ विभाग व प्रदूषण मंडळाकडून सुद्धा कोणतीही कार्यवाही न केल्याने परिसरातील तीन ते चार गावातील जनता त्रस्त झाली आहे.
अर्धवन ते मुकुटबन मार्गे वणी ते उमरेड पर्यंत कोळसा वाहतूक केली जाते. कोळसा भरलेले बहुतांश ट्रक चालक हे दारू ढोसून सुसाट वेगाने ट्रक चालवत असल्याचे गावक-यांचे म्हणणे आहे. त्यामुळे परिसरातील मुकुटबन, रुईकोट, अर्धवन, भेंडाळा, पांढरकवडा(ल) गणेशपूर व इतर गावातील शाळकरी मुलासह पुरुष व महिलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या कारणाने जीवितहानी होऊ नये यासाठी कडक पावले उचलावी अशी मागणी गावक-यांनी केली आहे.