रफीक कनोजे, झरी: झरीजामणी तालुक्यातील टाकळी व सतपल्ली या दोन गावातील ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत. २०१७-१८ मधील जन सुविधा निधीतून ग्रामपंचायत भवन बांधकाम करिता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाली. सदर कामाची ई- निविदा होऊन वर्क आर्डर झाले. मात्र वणी विधानसभेचे विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोद्कुरवार यांनी आक्षेप घेतल्यामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकारी पं.स. झरी जामणी यांना टाकळी व सतपल्ली येथील ग्रामपंचायत भवनचे बांधकाम पुढील आदेशापर्यंत थांबविण्याचे लेखी आदेश दिले आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी विकास कामांना आळा घालत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. या उपोषणाला टाकळी व सतपल्लीचे सरपंच, पं.स. झरी जामणीचे उप सभापती तसेच दोन्ही गावातील नागरिक नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पासून आमरण उपोषणावर बसले आहे. बुधवारी उपोषणाचा तिसरा दिवस आहे.
प्राप्त माहितीनुसार जिल्हा नियोजन समितीची २२ जुलै २०१७ रोजी झालेल्या सभेमध्ये झरी तालुक्यातील भेंडाळा, दुर्भा, सतपल्ली, टाकळी , जामणी, चिचघाट व दाभाडी या ७ गावामध्ये जनसुविधा निधीतून ग्रामपंचायत इमारती बांधकामची मंजुरी देऊन त्याकरिता पंचायत समितीच्या खात्यात सदर निधी वळती करण्यात आला. सर्व कामाची इ-निविदा होऊन काम सुरु करण्याचे वर्क आर्डर मिळाले असता वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी दि. २७ डिसे. रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी , जि.प. यवतमाळ यांना झरी तालुक्यातील टाकळी व सतपल्ली येथे मंजूर झालेले ग्रामपंचायत भवन रद्द करण्याचे पत्र दिले.
आमदाराच्या विनंतीच्या अनुषंगाने मु.का.अ., जि.प. यवतमाळ यांनी २९ डिसे. रोजी गट विकास अधिकारी पं.स. झरी यांना टाकळी व सतपल्ली येथील ग्रामपंचायत भवन बांधकाम पुढील निर्णयापर्यंत थांबविण्याचे आदेश दिले. टाकळी व सतपल्ली येथे ग्रामपंचायत इमारती नसून शाळेच्या एका खोलीमध्ये बसून सरपंच व सचिव ग्रामपंचायतचा गाडा हाकत असतानी आमदारांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे लहान गावाच्या विकासाला खीळ बसत असल्याचा आरोप करीत टाकळीचे सरपंच संदीप बुर्रेवार, सतपल्लीचे सरपंच शंकर सिडाम तसेच पंचायत समितीचे उप सभापती नागोराव उरवते सह टाकली व सतपल्ली येथील नागरिक १ जानेवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषणास बसले आहे.
या बाबत जिल्हाधिकारी यवतमाळ, विधानपरिषद उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी आमदार वामनराव कासावार आणि जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्याकडे मुद्द्यासह निवेदने देण्यात आले आहे. या वेळी नागोराव उरवते , संदीप बुर्रेवार, शंकर सिडाम, केशव लक्षटीवार, वसंत रादेवार, कैलाश धोटे, नरसिंगराव टोंगलवार, गजानन बगुलवार, बापूराव लक्षटीवार, गजानन गुंजवार, सतीश मन्ने, राजू मंचलवार सह शेकडो नागरिक होते.
वणी बहुगुणीला दिलेल्या प्रतिक्रियेत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार म्हणाले की….
स्वत:च्या विधानसभा क्षेत्रात होणाऱ्या विकास कामाना माझा कोणताही विरोध नाही, मात्र झरी तालुक्यातील अडेगाव व मांगली सारख्या मोठ्या गावामध्ये ग्रा.पं.ची इमारती नसताना तसेच जिल्हा परिषद सदस्य व लोक प्रतिनिधी यांना डावलून पं.स. झरी चे गट विकास अधिकारी गवई यांनी परस्पर गावाची यादी बनवून पाठविली आहे. तालुक्यातील जामणी, चिचघाट व दाभाडी हे आदिवासी व पैसा अंतर्गत गावे असल्यामुळे तिथे ग्राम पंचायत भवन गरजेचे आहे. परंतु तब्बल ८ हजार लोकसंख्या असलेले अडेगाव व २.५ हजार लोकसंख्येचे मांगली गावात ग्रा.पं. इमारती नसल्यामुळे प्राथमिकतेच्या आधारे त्या गावात भवन बांधकाम करण्याची माझी मागणी होती. – आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार.