बहुगुणी डेस्क, वणी: मागील 17 वर्षांपासून सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना समितीतर्फे समाज सहभागातून सुरू असलेला हा उपक्रम अद्वितीय आहे. मागील 14 वर्षांपासून मी या उपक्रमाची एक भाग आहे, याचा अतिशय आनंद होत आहे अशी प्रतिक्रिया वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी व्यक्त केली. ते या उपक्रमाअंतर्गत आर्थिकदृष्ट्या मागास मुलींना शैक्षणिक साहित्य वितरित करताना बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वणी नगर परिषदेचे अध्यक्ष तारेंद्र बोर्डे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, पंचायत समितीच्या सभापती लिशा विधाते, उपसभापती संजय पिंपळशेंडे, तहसिलदार रविंद्र जोगी, नायब तहसीलदार विवेक पांडे, न.प. शिक्षण सभापती आरती वाढंरे, प्रा. महादेव खाडे, समितीचे अध्यक्ष किशन खुंगर हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण ईद्दे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला न.प.शाळा क्र. 5 च्या विद्यार्थिनीं मनीषा मेश्राम, भुनेश्वरी उईके, राहीन खान, स्नेहा तिवारी यांनी स्वागतगीत गायले. त्यानंतर उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत यांनी हा उपक्रम सातत्याने सुरू असल्याबाबत आनंद व्यक्त केला. लिशा विधाते, संजय पिंपळशेंडे, प्रा. महादेव खाडे, आरती वांढरे यांनी या वर्षी या समितीमार्फत वणी नगर परिषद, वणी व मारेंगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेमध्ये शिकणाऱ्या 232 मुलींना शैक्षणिकदृष्टया दत्तक घेऊन आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप केल्याबाबत समाधान व्यक्त करून हा उपक्रम सातत्याने सुरू राहावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयोजन समितीचे सचिव गजानन कासावार यांनी केले. आभार प्रदर्शन अशोक चटप यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी हरेंद्र चौधरी, चंद्रकांत फेरवानी, जयप्रकाश सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.