विंचू चावलेली गरोदर महिला उपचारविना दवाखान्यातून परत
डॉक्टरांनी केला मोबाईल स्विच ऑफ, रुग्णामध्ये संताप
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून ओळख असलेल्या मुकूटबन येथील शासकीय रुग्णालयातून विंचू चावलेल्या एका गरोदर महिलेला उपचार न करता रात्रीच घरी परत जावे लागल्याने संताप व्यक्त होत आहे. मुकूटबन येथून 8 किमी अंतरावर असलेल्या भेंडाळा येथील लीना विठ्ठल येडे वय २२ वर्ष या गरोदर महिलेला रात्री १० वाजता दरम्यान विंचू (इंगळी) ने चावा घेतल्याने महिलेला प्रचंड त्रास होऊ लागला. महिलेचा त्रास बघून घरची मंडळी व गावातीलच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारोती गिरसावळे यांनी महिलेला मुकूटबन येथील शासकीय रुग्णालयात ११ वाजता दरम्यान आणले.
दवाखान्यात मडावी नामक चपराशी व एक नर्स होती. महिलेच्या उपचाराकरिता डॉक्टर नसल्याने डॉक्टर यांना अनेकदा फोन लावला. मात्र त्यांनी फोन उचलला नाही उलट मोबाईल बंद केला. ज्यामुळे पीडित महिलेचे नातेवाईक व गिरसावळे हे डॉक्टरांच्या कॉर्टरवर जाऊन त्यांनी डॉक्टरांना जोरजोरात आवाज दिला. परंतु डॉक्टर उठले नाही. अखेर त्रास सहन करीत असलेल्या महिलेला परत भेंडाळा गावी परत घेऊन जावे लागले.
डॉक्टरांच्या अशा वागण्यामुळे रुग्णात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. सदर महिला गरोदर असल्याने तिचे चेकअप शासकीय रुग्णालयातच केले जात होते. त्यामुळे खासगी दवाखान्यात दाखविण्यापेक्षा शासकीय रुग्णालयात दाखविण्याचे त्यांनी ठरविले होते. पण अखेर महिलेचा विंचू चावल्यावर उपचाराविनाच राहावे लागेल.
झरी तालुका आदिवासी बहुल तालुका असून तालुक्यातील गोरगरीब व आदिवासी जनतेच्या सोईकरिता रुग्णालये असून रुग्णांना रात्रीबेरात्री गरीब जनतेला शहरी ठिकाणी धावपळ होऊ नये याकरिता डॉक्टर नर्स व इतर सर्व सुविधा करण्यात आल्या आहे. परंतु याचा कोणताही उपयोग रुग्णांना होत नसल्याचे ओरड ऐकला मिळत आहे. यापूर्वी सुद्धा अश्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या त्यामुळे वरिष्ठ अधिकारी लोकप्रतिनिधी यांनी अश्या गंभीर बाबी कडे लक्ष देऊन रुग्णालयाचा कारभार सुधारावे अशी मागणी होत आहे.