बहुगुणी डेस्क, वणी: आधी आपसी करारनाम्यावर पती-पत्नी विभक्त झालेत. मात्र त्यानंतर पतीवर कौटुंबीक हिंसाचाराचे गुन्हे दाखल केलेत. कोर्टाकडून मासिक पोटगी सुरु केली. मात्र दुसरीकडे एका दुस-याच तरुणाशी मंदिरात गुपचूप विवाह उरकून घेतला. याबाबत पतीला माहिती मिळाली असता त्याने नातेवाईक माहेरी पाठवले. मात्र त्यांना मारहाण करण्यात आली. घटस्फोट न घेता लग्न करणा-या पत्नीविरोधात तसेच मारहाण करणा-या मुलीच्या नातेवाईकांविरोधात मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादी (35) हा राळेगाव तालुक्यातील खैरी येथील रहिवासी आहे. त्याचे मारेगाव तालुक्यातील पहापळ येथील एका मुलीशी (35) दिनांक 21 एप्रिल 2022 रोजी रितीरिवाजाप्रमाणे लग्न झाले होते. लग्नानंतर दोघांचा संसार सुरू होता. मात्र 10 महिन्यानंतर पत्नी माहेरी निघून आली. परत आल्याच्या चार महिन्यांनी म्हणजे ऑगस्ट 2023 मध्ये एका मध्यस्थीच्या माध्यमातून या दोघांनी आपसी सहमतीने 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर घटस्फोटाचा करारनामा केला. त्यानंतर ते एकमेकांपासून समोपचाराने विभक्त झालेत.
खावटीसाठी न्यायालयात धाव
मात्र काही दिवसांनी पत्नीने न्यायालयात धाव घेतली. तिने मारेगाव प्रथम श्रेणी कोर्टात पोटगीसाठी याचिका दाखल केली. तसेच विजय आसुटकर व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात कौटुंबीक हिंसाचाराची केस दाखल केली. न्यायालयाने पत्नीला दोन हजार रुपये मासिक अशी पोटगी सुरु करण्याचा आदेश दिला. तेव्हापासून ही केस न्यायालयात सुरु आहे. तसेच त्या दोघांचा अद्यापही कायदेशीररित्या घटस्फोट झालेला नाही.
घटस्फोट न होता पत्नीचे लग्न
गेल्या आठवड्यात दिनांक 19 मे रोजी पत्नीने सालेभट्टी येथील एका तरुणाशी पांढरदेवी येथील देवस्थानात हिंदू रितीरिवाजाप्रमाणे लग्न केले. या विवाहाची नोंद पांढरदेवी येथील देवस्थानात करण्यात आली आहे. लग्नात उपस्थित एका व्यक्तीने पतीला दोघांच्या लग्नाचा फोटो पाठवला. पत्नीच्या लग्नाची माहिती मिळतात पतीने त्याच्या नातेवाईकांना पत्नीच्या माहेरी बोलणी करण्यासाठी पाठवले. मात्र त्यांना मारहाण करण्यात आली, असा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे.
पतीने तातडीने मारेगाव पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी दुसरे लग्न करणारी पत्नी, मुलीचे वडील, काका अशा पहापळ येथील 5 जणांविरोधात बीएनएसच्या कलम 115 (2), 351 (2), 352 (3), 352, 82 (1) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
Comments are closed.