बहुगुणी डेस्क, वणी: सध्या उन्हाळ्याच्या सुट्या सुरू आहेत. या सुट्यांचा आनंद घेण्यासाठी ‘तो’ आपल्या आजोबांच्या गावी अर्जुनीला आला. आजोळी त्याचे दिवस आनंदात जात होते. मात्र रविवारी सकाळी 9 च्या दरम्यान झालेल्या घटनेनं सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. क्षणातच होत्याचं नव्हतं झालं. हिंगणघाट तालुक्यातील कुटकी इथल्या राकेश मोहन मेश्राम या किशोरवयीन मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला. नवव्या वर्गात शिकणाऱ्या केवळ 15-16 वय असलेल्या राकेशच्या जाण्यानं सर्वांनाच जबर हादरा बसला.
प्राप्त माहितीनुसार, मारेगाव तालुक्यातील अर्जुनी येथे रामदास मडावी राहतात. शाळेच्या सुट्टया लागल्याने हिंगणघाट तालुक्यातील कुटकीचा त्यांचा नातू अर्जुनीला आजोळी आला. नातू राकेश हा मागील पंधरा दिवसांपासून उन्हाळ्याच्या सुट्यांचा आनंद घेत होता. आजोबा बाहेरगावी गेल्याने सकाळी तो त्यांच्या बैलांना पाणी पाजण्यासाठी अर्जुनी येथील तलावाकडे घेऊन गेला होता. पण बराच वेळ झाला तरी राकेश घरी परतला नाही. त्यामुळे सगळे काळजीत पडलेत.
सकाळी राकेश अर्जुनी पाझर तलावात गेला. बैल पाणी पीत असताना एका म्हशीने बैलास धडक देत राकेशच्या हातातील कासरे सुटले. राकेशचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. कुटुंबातील काही सदस्य त्याचा शोध घेण्यासाठी तलावाच्या दिशेने गेलेत. त्यांना राकेशचा मृतदेहच दिसला. नेमक्या त्या जागेवर तलावात मोठे खड्डे असल्याने त्यात राकेश बुडाला. त्याचा जागेवरच अंत झाला. त्यांनी सदर घटनेची माहिती लगेच गावातील पोलीस पाटील यांना दिली. पोलिस पाटील यांनी लगेच सदर घटनेची माहिती मारेगाव पोलीस स्टेशनला दिली.
माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळ पंचनामा करून त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. त्याच्या पश्चात आई-वडील व दोन बहिणी असा प्राप्त परिवार आहे. सदर घटनेचा पुढील तपास ठाणेदार संजय सोळंके यांचे मार्गदर्शनाखाली जमादार दिगंबर कनाके करीत आहे.
Comments are closed.