वणीचा हर्षल झळकला शार्क टँकमध्ये… वणी बहुगुणीच…

देशभरातून कौतुकाचे ट्वीट (x)... काय झाले प्रोग्रॅममध्ये.....?

निकेश जिलठे, वणी: घराच्या गच्चीवरील छोट्याशा जागेत हायड्रोजन कार बनवून एक खळबळ उडवून देणारा वणीतील हर्षल नक्षणे हा शार्क टँकच्या सिजन 3 मध्ये झळकला आहे. या प्रोग्रॅममध्ये हर्षलच्या प्रॉडक्टचे प्रचंड कौतुक झाले असले तरी मात्र त्याच्या हाती निराशा आली. त्याचा व्हिडीओ सर्व सोशल मीडियातून झळकल्यानंतर देशभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. देशभरातील मान्यवर व्यक्तींनी व्टीट एक्स करून हर्षलला मदतीचे आवाहन केले आहे. हर्षलच्या या अनोख्या प्रयोगामुळे वणीचे नाव केवळ राज्यातच नाही अख्या देशात उंचावले आहे. हर्षल याने हायड्रोजन लिक्विड इंधनावर धावणारी प्रदूषणमुक्त व एकआयबेस सेल्फ ड्रायव्हिंग सोनिक कार घरीच तयार केली. 1 लिटर हायड्रोजन इंधनमध्ये 250 ते 300 किमी धावणाऱ्या या कारचे टायर आणि काच वगळता इतर पार्टस वणीतच तयार करण्यात आले. 

 

काय झाले शार्क टँकमध्ये?
हर्षल त्याच्या कारमधून पाचपैकी तीन शार्क्सना टेस्ट ड्राईव्हसाठी घेऊन गेला होता. हर्षलने त्याच्या स्टार्टअपमधील 4 टक्‍के इक्विटी भागभांडवलाच्या बदल्यात 2 कोटी रूपये गुंतवणुकीची मागणी केली. सगळ्याच शार्क्सनी हर्षलच्या मेहनतीचं, त्याच्या महत्त्वाकांक्षेचं कौतुक केलं. पण देशात यासाठी पुरेशा मूलभूत सुविधाच नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. देशात हायड्रोजन फ्युएल स्टेशन्सच पुरेशी नसताना हा प्रयोग कसा यशस्वी होणार, त्यातून नफा कसा मिळणार असे प्रश्न आणि शंका शार्क्सनी उपस्थित केल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Harshal Nakshane (@mr.harshalhr)

वणी येथील साधनकरवाडी येथे वास्तव्यास असलेले महादेव नक्षणे यांचे पुत्र हर्षलचे शालेय शिक्षण एसपीएम शाळेत झाले. त्यानंतर हर्षलने बालाजी पॉलिटेक्निक सावर्ला येथून पॉलिटेक्निकचे शिक्षण पूर्ण केले. हर्षलने 2021 मध्ये पुणे येथील सिम्बॉसिस कॉलेजमधून एम.टेक डिग्री मिळविली. पेट्रोल डीझलच्या वाढत्या किमती व वाहनांमुळे होणारे प्रदूषण लक्षात घेऊन हर्षलला ग्रीन हायड्रोझनवर चालणारी कार तयार करण्याची कल्पना सुचली.

घरच्या गच्चीवर उभारली फॅक्टरी
वणीतीलच कुणाल आसुटकर यासह काही मित्राच्या मदतीने अथक परिश्रम करून 2021 मध्ये आपल्या राहत्या घरी गच्चीवर कार निर्मितीचे कार्य सुरु केले. कारसाठी लागणारे सुटे पार्टस, बॉडी, दरवाजे तयार करण्यासाठी हर्षल यांनी वेल्डिंग मशीन, मोल्डिंग मशीन, स्प्रे मशीन व इतर यंत्र खरेदी केले. कारच्या इंजिनचे काही भाग बाहेरून खरेदी करण्यात आले. कारच्या विंडशिल्ड व टायर अहमदाबाद येथून बोलाविण्यात आले. विशेष म्हणजे कार धावण्यासाठी आवश्यक असलेले हायड्रोजन लिक्विड इंधन हर्षलने स्वतः तयार केले.

टेस्लाच्या आधीपासून एआय तंत्रज्ञानाचा वापर
नॉर्मल ऑटोमॅटिक कारमधील एआय रस्त्यावरील लेन पाहून काम करते. तर हर्षलच्या कारमधील यंत्रणा भारतीय रस्त्यांचा विचार करुन तयार करण्यात आलेली आहे. त्यात एमर्जन्सी ब्रेकसारखी सुविधाही आहे. परदेशी कंपन्या लिडारचा वापर करतात. हर्षलची कार थ्रीडी कॅमेरा आणि अल्ट्रासॉनिक सेंटरच्या मदतीनं काम करते. टेस्ला आताच थ्रीडी कॅमेऱ्याचा वापर करु लागली आहे. पण आताही त्यांच्या यंत्रणेला समोर असलेली वस्तू प्लास्टिक आहे की दगड ते ओळखता येत नाही. पण माझ्या कारमधील एआय यंत्रणा ते ओळखण्यास सक्षम आहे, असं हर्षलनं कार्यक्रमात सांगितलं.

हायड्रोजनचालित कार बनविण्यात तब्बल 18 लाख रुपये खर्च झाले. सोबतच कारमध्ये स्वचालीत (self driving) सिस्टीम व सेन्सर बसविण्याचा खर्च 10 लाख रुपये आला. असे एकूण 28 लाख रुपय खर्च करून सोनिक-1 कार तयार झाली. कारचे रोडटेस्ट झाल्यावर जुलै 2022 मध्ये मुंबई येथे आयोजित एका ऑटोमोबाईल प्रदर्शनीत सोनिक-1 कारचे प्रदर्शन करण्यात आले होते. त्यानंतर विविध एक्झिबिशन आणि कार्यक्रमानंतर हर्षल शार्क टँकच्या सिजन 3 मध्ये झळकला आहे. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Harshal Nakshane (@mr.harshalhr)

Comments are closed.