वेळ चुकली आणि…. भीषण अपघातात दोघे गंभीर जखमी

भालर येथे जात असताना दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने अपघात

जितेंद्र कोठारी, वणी: भालर रोडवर एका दुचाकीसमोर डुक्कर आडवं आल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात चालक आणि त्या मागे बसलेली व्यक्ती दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. आज सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. सध्या या दोघांनाही प्राथमिक उपचारानंतर चंद्रपूर येथे पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे की अभिनव कांबळे रा. नागपूर, हल्ली मुक्काम प्रगती नगर वणी वय अंदाजे 20 व प्रबोध चांदेकर वय अंदाजे 21 राहणार छोरिया ले आऊट वणी येथील रहिवाशी आहेत. ते दोघेही भालर येथील वेकोलि कार्यालयात प्रशिक्षणार्थी आहे. हे दोघे प्रबोधची केटीएम (MH29 BT3216) या रेसर बाईकने सकाळी भालर येथे प्रशिक्षणास जात होते.

सकाळी 9.30 वाजताच्या दरम्यान भालर रोडवरील एमआयडीसी परिसरातील इंडो कोल वॉशरीच्या जवळ यांच्या दुचाकीसमोर अचानक एक डुक्कर आडवं आलं. भरधाव असलेल्या बाईकने डुकराला जोरदार धडक दिली. त्यामुळे प्रबोधचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून दोघेही बाजूला जोरदार आदळले. दोघांच्याही डोक्याला भीषण मार लागला. तर धडक दिलेल्या डुकराचा जागीच मृत्यू झाला.

अपघात झाल्याचे लक्षात येताच रस्त्याने जाणारे नागरिक तसेच लालगुडा परिसरातील नागरिक घटनास्थळी आले. अपघाताची माहिती मिळताच त्यांचे काही प्रशिक्षणार्थी सहकारी देखील घटनास्थळी दाखल झाले. त्या दोघांनाही उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दोघांपैकी मागे बसलेल्या अभिनवची प्रकृती गंभीर आहे. त्याला चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर काही वेळाने प्रबोधलाही उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आल्याची माहिती आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

वेळ चुकली आणि….
गंभीर जखमी असलेला नागपूर येथील अभिनव कांबळे हा काही दिवसांआधी प्रशिक्षणार्थी म्हणून वेकोलिमध्ये जॉईन झाला आहे. तो काही कामानिमित्त वरोरा येथे गेला होता. तो नेहमी त्याच्या दुस-या मित्रासह दुचाकीने भालरला जायचा. मात्र त्याला वरो-याहून वणीला परतून भालर येथे जायचे होते. त्यामुळे तो आज प्रबोधसह भालर येथे जाण्यासाठी निघाला होता. मात्र लालगुडा चौफुलीपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरच त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला.

दुचाकीस्वारांनी हेलमेट वापरण्याचे आवाहन
काम, नोकरी, बाजार इत्यादी कारणांसाठी मोठ्या प्रमाणात लोक तालुक्याच्या ठिकाणी दुचाकीने येतात. तसेच अनेक लोक नोकरी व इतर कामांसाठी दुचाकीने परगावी जातात. अवजड वाहनांची रहदारी, खराब रस्ते किंवा वन्य प्राणी आडवे आल्याने अपघाताच्या घटना नित्याच्याच आहे. तालुक्यात एका महिन्यात अनेकांना अपघातामुळे जीव गमवावा लागतो. या अपघातात सर्वाधिक मृत्यू हे डोक्याला गंभीर ईजा झाल्याने होतात. अनेक तरुण तसेच घरातील कर्त्याधर्त्या व्यक्तींना डोक्यावर केवळ हेलमेट नसल्याने जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे फक्त डोक्यावर हेलमेट असल्याने अनेकांचा जीव वाचला आहे. त्यामुळे दुचाकी चालकांनी हेलमेटचा वापर करावा असे आवाहन ‘वणी बहुगुणी’तर्फे करण्यात येत आहे.

हे देखील वाचा:

WPL चे थाटात उद्घाटन…. 11 टायगर्स रोअरिंगची विजयी सलामी

कोंबड्याची झुंज लावणाऱ्या तिघांना अटक

Comments are closed.