सुशील ओझा, झरी: सध्या पानटपरी बंद असल्याने पानटपरी चालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे अनेक पानटपरी चालक सध्या अवैधरित्या खर्रा विकत आहे. त्यावर मुकुटबन पोलिसांनी मुकुटबन, अडेगाव, खडकी व गाडेघाट येथे धाड टाकून खर्रा विक्रेत्यांवर कारवाई केली आहे.
केवळ मुकुटबन येथेच नाही तर ग्रामीण भागातही बंदी असताना मोठ्या प्रमाणात खर्रयाची विक्री होत आहे. मुकुटबन पोलीस ठाण्याला या संदर्भात माहिती मिळाली होती. या माहितीवरून त्यांनी मुकुटबन येथील 3, अडेगाव 2, खडकी 1 व गाडेघाट येथील 1 खर्रा विक्रेता अशा सात जणांवर दंडात्मक कार्यवाही केली. त्यामुळे खर्रा विक्रेत्यांचे दाबे दणाणले आहे. महत्त्वाचं म्हणजे ठाणेदार धर्मराज सोनुने यांनी स्वतः कार्यवाहीत भाग घेत या विक्रेत्यांवर कारवाई केली आहे.
सध्या संचारबंदीमुळे खर्रा, पान व दारू पिणाऱ्यांची मोठी फजिती होत आहे. तर पानटपरी चालक होणारे नुकसान भरून काढण्याच्या उद्देशाने बंद टपरीजवळच खिश्यात घोटलेले खर्रे ठेवून त्याची लपून छपून विक्री करीत आहे. 20 ते 40 रुपयांमध्ये ही विक्री होत आहे. सध्या मोजक्याच ठिकाणी अवैधरित्या खर्रा मिळत असल्याने तिथे ग्राहकांची झुंबड उडत आहे.