11 जुलै 1979, 40 वर्षापूर्वीची ‘ती’ थराराक घटना

स्कायलॅबच्या कोसळण्याच्या धास्तीने वणीकरांचा रोखला होता श्वास...

0

जब्बार चीनी वणीः सध्या कोरोनामुळे शहरापासून तर गावखेड्यापर्यंत सर्वांमध्येच भितीचे सावट पसरले आहे. या अभूतपूर्व दहशतीने 40 वर्षापूर्वीच्या स्कायलॅब या उपग्रह (स्पेस स्टेशन) कोसळण्याच्या दहशतीची आठवण वणीकरांमध्ये ताजी झाली आहे. अमेरिकेने आंतराळात पाठवलेली स्कायलॅब काही तांत्रिक बिघाडामुळे पृथ्वीवर पडणार होती. त्यातही ही स्कायलॅब भारतावर कोसळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

स्कायलॅब कोसळल्यानंतर त्यातील रसायनांचा मोठा स्फोट होऊन निघणा-या विषारी धुराने अनेक शहरे आणि गावातील नागरिक मृत्यमुखी पडणार, अशी भिती त्यावेळी सर्वत्र पसरली होती. आज वणी कोरोनाच्या दहशतीत जगत आहे. अगदी थोड्या बहुत फरकाने 40 वर्षांपूर्वीही अशीच काहीशी परिस्थिती वणीत निर्माण झाली होती.

काय आहे स्कायलॅब ? 

1973 साली नासाने स्कायलॅब अंतराळात पाठवले. स्कायलॅब हे नासाचे पहिले स्पेस स्टेशन. स्पेस स्टेशन म्हणजे आंतराळातील प्रयोग शाळा. तर हे स्पेस स्टेशन मानव रहित होती. पृथ्वीला प्रदक्षिणा घालताना तांत्रिक बिघाडामुळे स्कायलॅबने पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केला. त्यामुळे ते पृथ्वीवर कोसळणार होते. शास्त्रज्ञांनी खगोलीय गणितं काढण्यास सुरूवात केली. त्यानुसार ते 11 जुलै 1979 या दिवशी ते पृथ्वीवर कोसळणार होते. आणि तेही भारतावर कोसळण्याचा अंदाज काढला.

लोकांमध्ये काय परिणाम झाले या घटनेचे?

आजच्यासारखा इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा सोशल मिडिया नसतानाही स्कायलॅब भारतावर कोसळण्याची बातमी खेड्यापाड्यांपर्यंत वा-यासारखी पोहोचली. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात मृत्युछाया गडद झाली. मृत्यूच्या धास्तीने दहशतीत केलेल्या अनेक गमजीजमती या काळात बघायला मिळाल्या. खिशाला कात्री लावून जीवन जगणारे लोक देखील आप आपला खिसा सढळ हाताने खुला करीत होते. कोणी दानातून पुण्य करण्याचा प्रयत्न करत होते . सर्वधर्मिक धार्मिक स्थळांवर विविध धार्मिक विधी सुरू झाल्या. यज्ञ सुरू झाले.

11 जुलै 1979 सालचा तो दिवस…

आता मरण अटळ आहे असे म्हणून अनेक जण मनातील इच्छा आकांक्षांना वाट मोकळी करून देत होते. कुटंबातील सर्व सदस्य एकत्र येत होते. तर काही ठिकाणी मृत्यूच्या भितीने स्मशान शांतता होती. विषारी वायू आणि स्फोटातून जिवंत राहता यावे म्हणून काहींनी जमिनीत भुयार (तळघर) तयार केले होते. किमान आपल्या बालकांना तरी जीवन जगता यावे म्हणून त्या तळघरात एक संदुक तयार केले होते. त्या संदुकावर लाकडी पाट्या ठेवून वरून मातीचे लेपन लावले गेले. काहींनी घराच्या दारं खिडक्या संपूर्ण पॅक केल्या होत्या. दरम्यान देशात हायअलर्ट जाहीर करण्यात आला. संपूर्ण देशभर जागोजागी पोलीस व सैन्यांचे ताफे दिसत होते. वणीतही ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

काय होती वणीत ‘त्या’ वेळी परिस्थिती?

40 वर्षांपूर्वीची ती घटना आठवताना छ. शाहु महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश चचडा सांगतात की…

त्या काळी केवळ वृत्तपत्रे आणि रेडियोच्या माध्यमातूनच न्यूज कळायच्या त्यामुळे सर्वांचे लक्ष पेपरमध्ये आणि रेडियोवर काय अपडेट येत याकडे असायचे. सकाळी ७ च्या बातम्यात हा उल्लेख हमखास असायचा. एकीकडे लोकांमध्ये भीती होती तर दुसरीकडे काय होणार याचे औत्सुक्य वणीमध्ये होते. हा खेळ सुमारे एक महिना चालला.

याविषयी निवृत्त कर्मचारी जयंतराव लीडभीडे सांगतात की…. 
स्कायलॅब कुठे पडणार याविषयी बरेच वेगवेगळे मत होते. याविषयीही अनेक अफवा ही येत होत्या. मात्र, त्यावेळी अनेक विज्ञानाभ्यासक खगोलीय घटना उलगडून सांगत व लोकांना घाबरण्याचे कारण नाही असे आवाहन करत होते. त्यामुळे स्कायलॅब आपल्यावर पडणार आणि पडणार नाही असे वेगवेगळे मत मांडले जात होते. त्यामुळे काही काळ अस्थिरतेचे आणि गोंधळाचे वातावरण निमाण झाले होते.

तेव्हाही ‘व्हॉट्सऍप युनिवर्सिटी’ जोमात

याविषयी बोलताना पत्रकार बंडू निंदेकर सांगतात की…
त्यावेळी मी खूप लहान होतो. मात्र काही घटना आजही आठवतात. आज जशा व्हॉट्स ऍपवरून अफवा पसरवल्या जातात, तेव्हाही सोशल मीडिया नसतानाही आज सारख्याच अफवा पसरवल्या जात होत्या. त्या काळात सर्वात आधी रेडीओवर बीबीसीच्या अपडेट यायच्या. तेव्हा बीबीसीच्या न्यूज सर्वात विश्वासार्ह समजल्या जायच्या. आज जसे नासाचा हवाला देऊन लोक व्हॉट्सऍपवर अफवा पसरवतात. तशाच पद्धतीने तेव्हा बीबीसीने रेडियोवर नागपूरवर स्कायलॅब पडणार आहे. चंद्रपूरवर पडणार आहे. अशा अफवा बीबीसीच्या नावाने खपवल्या गेल्या.

निवृत्त शिक्षक गणपतराव झाडे सांगतात की त्या काही दिवसात लोकांनी चांगलीच मौजमजा केली. आता मरायचेच आहे म्हणून लोकांनी चिकन, मटन, दारू यावर प्रचंड पैसा खर्च केला होता. तेव्हा पेपरमध्ये आता मरायचे आहे म्हणून लोक नोटाची पुंगळी करून त्याची सिगरेटबनवून ओढायचे असे फोटो ही पाहिल्याचे आठवते. वणीतही काही लोक मौजमजा करत होते मात्र त्यावेळीच लोक कुटुंबवत्सलही होते. त्यांना कुटुंबाची चिंताही अधिक होती.

काय झालं स्कायलॅबचं?

नासाच्या अभियंत्यांनी ती मानवी वस्तीत पडू नये यासाठी सर्वतोपरी पर्यंत केले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. स्कायलॅबचा काही भाग हिंद महासागरात कोसळला तर काही भाग ऑस्ट्रेलियाच्या वाळवंटात कोसळला. संध्याकळी 7 वाजता जेव्हा रेडियोवर याची अनाउंसमेन्ट झाली तेव्हा सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला.

Leave A Reply

Your email address will not be published.