शालिवाहन प्रकल्पामुळे पिकांचे नुकसान

नुकसानग्रस्त विधवा हवालदिल, नुकसान भरपाईची मागणी

0
विलास ताजने, (मेंढोली): वणी तालुक्यातील शिंदोला लगतच्या चणाखा शिवारात शालिवाहन वीज प्रकल्प आहे. सदर प्रकल्पामुळे प्रकल्पालगतच्या शेतातील पिकांचे दरवर्षी नुकसान होते. गत आठवड्यात झालेल्या पावसाच्या वेळी प्रकल्पातील राखमिश्रित पाणी विधवा शेतकरी महिला विमल तंटू झाडे यांच्या शेतात वाहून पिकांचे नुकसान झाले. म्हणून नुकसान भरपाई देण्याची मागणी सदर महिला शेतकरी विमल झाडे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वणी तालुक्यातील शिंदोला ते कळमना या मार्गाच्या कडेला चणाखा शिवारात शालिवाहन वीज निर्मिती प्रकल्प आहे. सदर प्रकल्पात शेतातील पिकांच्या टाकाऊ अवशेषांपासून वीज निर्मिती केली जाते. प्रकल्पामुळे परिसरातील बेरोजगार युवकाना रोजगार मिळाला. मात्र त्याचवेळी प्रकल्पातील प्रदूषण नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य उपाययोजना न केल्यामुळे प्रकल्पातील धुळ लगतच्या शेतातील पिकांवर साचते. परिणामी पीक उत्पादवर आणि मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

पावसाच्या दिवसात प्रकल्पाच्या परिसरात साठलेले पाणी वाहून जाण्यासाठी योग्य नियोजन न केल्यामुळे पाणी लगतच्या शेतात वाहून जाते. नुकत्याच झालेल्या पावसात प्रकल्पातील राख मिश्रित पाणी विमल झाडे यांच्या नावे गट क्र. (५६/२) असलेल्या शेतात आले. त्यामुळे कापूस पिकाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. या अगोदर सुध्दा अशाच प्रकारचे नुकसान सप्टेंबर २०१६ मध्ये झाले होते. तेव्हा तहसिलदार यांचेकडे नुकसान भरपाई मिळण्यासाठी अर्ज केला होता. मंडळ अधिकाऱ्यांनी मोका पाहणी करूनही नुकसान भरपाई मिळाली नाही. वारंवार पिकांच्या होणाऱ्या नुकसानीमुळे सदर शेतकरी विधवेच्या कुटूंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे. म्हणून नुकसान भरपाईसह मुलाला प्रकल्पात नोकरी देण्याची मागणी झाडे यांनी केली आहे.

योग्य न्याय न मिळाल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. निवेदनाच्या प्रति संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. वारंवार निर्माण होणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी महसूल विभागाने सदर प्रकल्प अधिकाऱ्यांना २१ ऑक्टोबर २०१६ ला पत्र देऊन उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र तत्कालीन अधिकाऱ्यांनी पत्राला केराची टोपली दाखवली आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.