शेतक-यांच्या प्रश्नांवर काँग्रेस आक्रमक, काढणार शेतकरी न्याय यात्रा

9 ऑगस्टला मारेगाव येथून यात्रेला सुरुवात, शेतकरी, सर्वसामान्यांशी साधणार संवाद

 

विवेक तोटेवार, वणी: वणी विधानसभा क्षेत्र काँग्रेसतर्फे शेतकरी न्याय यात्रा काढली जाणार आहे. 9 ऑगस्टला मारेगाव येथून या यात्रेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर झरी तालुक्याच्या दौरा करून वणी तालुक्यात यात्रेचा समारोप होणार आहे. या यात्रेद्वारा वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, महिला, युवक यांच्याशी संवाद साधला जाणार आहे. सुमारे 10 ते 12 दिवस या यात्रेचा कालावधी असणार आहे. खा. प्रतिभा धानोरकर व माजी आमदार वामनराव कासावार यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्त्वात ही यात्रा होणार आहे. तर काँग्रेसचे झरी तालुका अध्यक्ष आशिष खुलसंगे हे या यात्रेचे मुख्य संयोजक राहणार आहेत, वणीतील वसंत जिनिंगच्या सभागृहात मंगळवारी दिनांक 24 जुलै रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी स्थानिक विकासाच्या मुद्यावर आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यावर जोरदार टिका करण्यात आली.

भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर ही यात्रा आहे. गेल्या वर्षी काँग्रेसतर्फे संपूर्ण विधानसभा क्षेत्रात जनसंवाद यात्रा काढण्यात आली होती. सध्या शेतक-यांकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकरी यांना केंद्रस्थानी ठेवून ही यात्रा काढली जात आहे. यासह विविध स्थानिक प्रश्न देखील यात्रेद्वारा मांडले जाणार आहेत, अशी माहिती आशिष खुलसंगे यांनी दिली. 

खनिज निधीचा वापर संपूर्ण जिल्ह्यात का – आशिष खुलसंगे
वणी विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती आहे. शासनातर्फे मोठ्या प्रमाणात या भागातील विकासासाठी कोट्यावधींचा फंड येतो. मात्र हा फंड संपूर्ण जिल्हयात खर्च केला जात आहे. हा वणी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांवर अन्याय आहे. मात्र आमदार या प्रश्नांवर अपयशी ठरले आहेत. ग्रामीण व शहरी भागात जे रस्ते तयार करण्यात आले आहेत. ते निकृष्ट दर्जाचे झाले असून अवघ्या काही महिन्यातच हे रस्ते उखडले गेले आहे. शिवाय जवळच्या लोकांना या कामाचे कंत्राट दिले जात आहे. या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप आशिष खुलसंगे यांनी पत्रकार परिषदेत केला.

महिला काँग्रेस अध्यक्ष संध्या बोबडे, महिला शहराध्यक्ष श्यामा तोटावार, तालुका अध्यक्ष घनश्याम पावडे, शहराध्यक्ष डॉ. महेंद्र लोढा, प्रभारी शहराध्यक्ष अशोक पांडे, मारेगाव तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, युवक काँग्रेस राहुल दांडेकर, शालिनी रासेकर इ. हे या यात्रेचे संयोजक आहेत. तर काँग्रेसचे तिन्ही तालुक्यातील पदाधिकारी हे यात्रेचे सहसंयोजक आहेत. पत्रकार परिषदेला घनश्याम पावडे, मारोती गौरकार, संध्या बोबडे, राहुल दांडेकर, अशोक पांडे, शामा तोटावार, राजेंद्र कोरडे, शालिनी रासेकर, सुरेखा लोडे, अंकुश माफूर, प्रा. शैलेश आत्राम यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

काय आहेत प्रमुख मागण्या?
वणी विधानसभा क्षेत्रातील पिकविमा व ओल्या दुष्काळापासून वंचित असलेल्या शेतक-यांना तात्काळ मदत जाहीर करावी, तिन्ही तालुक्यात शेतक-यांच्या मुलामुलींसाठी शासकीय वसतीगृह सुरु करावे, वणी व झरी तालुक्यातील कंपनीत 80 टक्के स्थानिकांना रोजगार द्यावा, मारेगाव व झरी येथे तात्काळ बसस्टँड करावे. मारेगाव व झरी तालुक्यात क्रीडा संकुलाचे काम तात्काळ सुरु करावे, मारेगाव एमआयडीसीचा प्रश्न तात्काळ सोडवावा. वणी शहर व वेकोलि अंतर्गत येणा-या गावात शुद्ध पाणी पुरवावे, खनिज विकास निधीचा वापर केवळ वणी विधानसभा क्षेत्रातच करावा, वणी विधानसभा क्षेत्रात लाखो रुपये खर्च करून केलेल्या निकृष्ट रस्त्याच्या कामाची चौकशी करावी, गावागावात बंद असलेल्या वॉटर फिल्टर प्लान्टची चौकशी करावी, शहर व गावातील प्रदूषणावर योग्य तोडगा काढावा इत्यादी स्थानिक प्रश्न तात्काळ सोडवण्याची मागणी यात्रेद्वारा केली जाणार आहे.

Comments are closed.