सुशील ओझा, झरी: लॉकडाऊनमुळे खाती व्यवसाय बंद आहे. त्यामुळे शिबला येथील एक कुटुंबाची उपासमार सुरू होती. त्याची माहिती सोशल मीडियावरून पसरताच जिल्हाधिकारी यांनी दोन दिवसापासून उपाशी असलेल्या कुटुंबाला जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचा आदेश दिला होता. त्यावर कार्यवाही करत अखेर त्यांच्या पर्यंत मदत पोहोचवण्यात आली.
शिबला येथे सुभाष बबन चव्हाण हे राहतात. ते खाती काम करतात. मात्र सध्या काम बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली होती. ही बाब लक्षात येताच सामाजिक कार्यकर्ते अखिल कोठारे यांनी फेसबुक व वॉट्स ऍपद्वारा प्रशासनाला याची माहिती दिली. अखेर जिल्हाधिकारी यांच्या पर्यंत ही बाब पोहोचताच त्यांनी झरी येथील तहसिलदारांना कार्यवाहीचा आदेश दिला. त्यानुसार तहसिलदार जोशी यांनी परिसरातील तलाठ यांना सूचना देत त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवली.
यावेळी तलाठी पाईकराव शेळके सुरपाम, ग्रामसेवक पाटील, कोतवाल तिरणकार यांनी उपासमार होत असलेल्या सुभाष बबन चव्हाण यांच्या घरी जाऊन धान्याची किट दिली. त्यासोबतच या टीमने गावातील अनेक गरीब आदिवासी कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीचा पंचनामा करून तहसील प्रशासनाला मदतीसाठी अहवाल दिला. पाटण पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल बारापत्रे यांनी देखील रेशन व भाजीपाला त्यांच्या घरी पोहोचता केला.