परमडोह शिवारात बंधारा बांधकाम

एसीसीचा उपक्रम, भूजल पातळीत झाली वाढ

0
विलास ताजने, (शिंदोला)- शिंदोला लगतच्या परमडोह शिवारातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उपसरपंच संदीप थेरे यांच्या मागणी नुसार एसीसीने सीएसआर निधीतून पाणलोट क्षेत्र विकास अंतर्गत बंधारा बांधून दिला. नुकत्याच जून महिन्यात पडलेल्या पावसामुळे सदर बंधारा भरून वाहू लागला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये हास्य फुलले आहे.
वणी तालुक्यातील शिंदोला येथे पाच दशकांपूर्वी असोसिएशन सिमेंट कंपनीची स्थापना करण्यात आली. सदर उद्योगामुळे परिसरातील बाधित गावासाठी एसीसी कडून उपक्रम राबविले जातात. ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करता कामाची पाहणी करून आखणी केली जाते.परमडोह परिसरातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी बंधारा बांधकाम करण्याची मागणी उपसरपंच संदीप थेरे यांनी केली. तसेच ‘फ’ वर्ग जमिनीवर बंधारा बांधकामाची तहसीलदार यांची परवानगी काढून दिली.
त्याअनुषंगाने एसीसीचे अधिकारी विजय खटी यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता आणि कर्मचारी वर्ग यांची नियुक्ती करून लगतच्या टेकडीच्या उताराला बंधारा बांधकाम करण्यात आले. सदर बंधाऱ्याची लांबी 24 मीटर असून उंची पायाभरणीपासून अडीच मीटर आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने बंधारा भरून वाहू लागला. बंधाऱ्यातील पाणी साठा जवळपास 500 मीटर अंतरापर्यंत अडवणूक भिंतीपासून मागे वाढलेला आहे.
सदर बंधाऱ्यामुळे जागेची धूप कमी होणे, वाहून जाणाऱ्या पाण्याचा वेग कमी होणे, खालच्या भागात भूजलाचे पुनर्भरण होणे, भूजलाची पातळी वाढणे त्याबरोबर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत होते.तसेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो.त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.