आणि शिंदोल्याच्या शेतकऱ्यांचे चेहरे आनंदले…..

दिवाळीच्या मुहूर्तावर मिळाली नुकसानभरपाई

0 830

विलास ताजने, मेंढोली : वणी तालुक्यातील शिंदोला येथील शेतकऱ्यांना बोन्ड अळीच्या नुकसान भरपाई पासून वगळण्यात आले होते. मात्र सरपंच विठ्ठल बोन्डे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाकडे सतत पाठपुरावा केला. अखेर ग्रामस्थांच्या लढ्याला यश मिळाले. ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर मिळालेल्या आर्थिक मदतीने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे.

२९ जून रोजी सरपंच विठ्ठल बोन्डे, शांतीलाल जैन, विठ्ठल सुरपाम, मुरलीधर ठाकरे, लुकेश्वर बोबडे, प्रितम बोबडे यांनी वणी उपविभागीय अधिकारी यांना नुकसान भरपाई मिळण्या संदर्भात निवेदन सादर केले होते. तसेच नागपूर येथील पावसाळी अधिवेशनात आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वाखाली महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन सादर केले होते. यावेळी सरपंच विठ्ठल बोन्डे, शांतीलाल जैन, लुकेश्वर बोबडे, नितीन आवारी, प्रितम बोबडे हजर होते.
नुकताच यवतमाळ जिल्हा बँकेला २१ लाख ८४ हजारांचा निधी प्राप्त झाला. एकूण २१५ सभासद शेतकऱ्यांना रविवारी आणि सोमवारी मदत वाटप करण्यात आली. यासाठी यवतमाळ जिल्हा बँकेचे व्यवसथापक चंद्रशेखर घोंगे, निरीक्षक प्रेम येरमे, लिपिक रमेश टोंगे, तुषार बलकी सहकार्य केले.
शिंदोला येथील शेतजमीन माहूर देवस्थान ट्रस्टच्या मालकीची आहे. मात्र सदर शेती  येथील शेतकऱ्यांच्या ताब्यात असून त्यांची वहिवाट सुरू आहे. पूर्वी शेतीच्या सातबारा उताऱ्यावर वाहितीदार म्हणून शेतकऱ्यांची नावे होती. परंतु सन २०१० पासून शासनाच्या आदेशानुसार सदर शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आले. आता केवळ सातबारावर मूळ मालकाचे म्हणजेच माहूर संस्थानच्या महंताचे नाव आहे. फक्त शेती वहितीदारांच्या ताब्यात असून वहिवाट सुरु आहे. मात्र शेतजमीन नावाने नसल्याने शासकीय योजना, बँकेचे शेती पीक कर्ज आदींचा लाभ मिळत नाही.
पूर्वी सर्व प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ मिळत होता. परंतु आता सर्व वाटा बंद झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेती करण्यासाठी कर्ज मिळत नसल्याने खाजगी सावकारांकडून कर्ज काढून शेती करावी लागते. मात्र नापिकी आणि शेतमालाला मिळणारा कमी भाव यामुळे शेतकरी डबघाईला आला आहे. शेतीवर मालकी हक्क मिळण्यासाठी लढा सुरू आहे. सर्व शेतकरी न्याय मिळण्याची प्रतिक्षा करीत आहे.
Comments
Loading...