विवेक तोटेवार, वणी: अवैध गोवंश तस्करीविरोधात शिरपूर पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई करत 34 गोवंशीय बैलांची सुटका केली. या कारवाईत ₹26.80 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
13 मे 2026 रोजी रात्री शिरपूर-चारगाव चौकी मार्गावर पोलिसांनी नाकाबंदी केली होती. गुप्त माहितीनुसार संशयित अशोक लेलँड कंटेनर वाहनाची तपासणी करण्यात आली. वाहन उघडताच पोलिसांनाही धक्का बसला. तब्बल 34 बैलांना एकमेकांना बांधून निर्दयीपणे कोंबून वाहतूक केली जात असल्याचे समोर आले.
वाहन चालक सरगम गुलाबसिंग धुर्वे याच्याकडे जनावरांच्या वाहतुकीसंदर्भातील कागदपत्रांची विचारणा केली असता तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. चौकशीत ही जनावरे कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती उघड झाली. तपासादरम्यान तौसिक अहमद (रा. ताजबाग, नागपूर) व इरफान (रा. गडचांदूर, जि. चंद्रपूर) यांच्या सांगण्यावरून गोवंश तस्करी सुरू असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी कंटेनर वाहन क्रमांक NL 01 AG 1288 किंमत अंदाजे ₹20 लाख आणि 34 गोवंशीय बैल किंमत ₹6.80 लाख असा एकूण ₹26.80 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1976, प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक अधिनियम आणि मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संतोष मनवर, धीरज गुल्हाने, इकबाल शेख, प्रशांत झोड, अविनाश बनकर, मंगेश सलाम, विजय फुलुके व किरण दासरवार यांच्या पथकाने पार पाडली.



Comments are closed.