विवेक पिदूरकर, शिरपूर: वर्धा नदीच्या पात्रालगत शेतशिवारात शिरपूर पोलिसांनी धाड टाकून देशी दारुचे 20 बॉक्स जप्त केले. शुक्रवारी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी आरोपी प्रवीण सुरेश गोपारदिपे (29) रा. उकणी ता. वणी याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या दारू पुरवठा करणा-या व्यक्तीचा शोध सुरू आहे. आरोपीने चंद्रपूर जिल्ह्यात विकण्यासाठी ही दारू आणली होती. दरम्यान आज आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ठाणेदार सचिन लुले यांना खब-यांकडून उकणी-बेलोरा बिट अंतर्गत येणा-या उकणी शेतशिवारात देशी दारूचा साठा असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरून पोलीस उप निरीक्षक संदीप एकाडे हे रात्री चमूसह कार्यवाही करण्यास गेले. उकणी-भद्रावती मार्गावर शोध घेतला असता रात्री 11.30 वाजताच्या दरम्यान वर्धा नदीच्या पात्राच्या बाजुला एका झुडपात एक इसम हिरो होंडा मोटार सायकल (MH 29 BK 5780) घेऊन संशयीतरित्या उभा दिसला. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन त्या तरुणाला ताब्यात घेतले व आजुबाजुला शोध घेतला असता एका झुडुपालगत देशी दारूचे 20 बॉक्स आढळून आले.
पोलिसांनी त्या तरुणास त्याने त्याचे नाव प्रवीण सुरेश गोपारदिपे (29) रा. उकणी ता. वणी असल्याचे सांगितले. तो रखवाली करत असलेल्या बॉक्सची पाहणी केली असता प्रत्येकी बॉक्समध्ये 90 मीलीच्या 100 बॉटल्स याप्रमाणे 20 बॉक्समध्ये 2 हजार बॉटल आढळून आल्या. पोलिसांनी 2 हजार बॉटल्स ज्याची किंमत 52 हजार रुपये व हिरो होन्डा मोटार सायकल किंमत 50 हजार रुपये असा 1 लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी जप्त केलेल्या साठ्याबाबत विचारणा केली आरोपीने सदर साठा सीमापार असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात विक्री करण्यासाठी आणला असल्याची माहिती दिली. तसेच वणी येथील एका मित्राने त्याच्या कारने हा साठा आणून दिल्याची माहितीही त्याने पोलिसांना दिली. या प्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम नुसार आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. तर दारू साठा पुरवणा-या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहे.
आज आरोपीला वणी येथील न्यायलयात हजर केले असता आरोपीला न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर कारवाई संदीप एकाडे यांच्या मार्गदर्शनात गुणवंत पाटील, संजय खांडेकर, विनोद मोतेराव, संतोष उघडे नीलेश भुसे यांनी पार पाडली.
हे देखील वाचा: