विलास ताजने, मेंढोली: गेल्या आठवड्याभरापासून पुरामुळे बंद असलेला शिवणी-चिंचोली हा मार्ग अखेर मोकळा झाला. पुरात वाहून आलेला मलबा पुलावर साचल्याने हा रस्ता बंद होता. त्यामुळे गावाचा संपर्क तुटला होता. शुक्रवारपासून हा रस्ता सुरू होऊन या रस्त्यावर पुन्हा वाहतूक सुरू झाली आहे.
सावंगी जवळ शिवणी-चिंचोली हे दोन्ही गाव निर्गुडा नदीकाठावर वसलेले आहे. या गावाला एक पूल जोडतो. गेल्या आठवड्यापासून अतिवृष्टीमुळे या पुलावर पुरात वाहून आलेला मलबा साचला होता. त्यामुळे हा रस्ता बंद होऊन गावाचा संपर्क तुटला होता. हाच मुख्य रहदारीचा असल्यामुळे गावक-यांना समस्यांचा सामना करावा लागला.
यासमस्येबाबत चिंचोलीचे सरपंच जयेंद्र निखाडे यांनी एसीसी सिमेंट कंपनीला संपर्क साधून हा मलबा काढण्याची विनंती केली होती. अखेर आज शुक्रवारी दुपारी 3 च्या दरम्यान एसीसी सिमेंट फॅक्ट्रीतर्फे मलबा काढण्यासाठी जेसीबी मशिन लावली. या मशिनद्वारे हा मलबा काढण्यात आला. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला आहे.
यावेळी चिंचोलीचे सरपंच जयेंद्र निखाडे, विलास निखाडे, अनिल चहारे, गजानन ठाकरे, शिवणीचे तलाठी नितेश पाचभाई, ढाकोरीचे तलाठी विक्रमसिंग घुसिंगे आणि शिवणी व चिंचोलीचे ग्रामस्थ उपस्थित होते.