मंगळवारी वणीत रंगणार शिवकालीन युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांचा थरार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: छ. शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्ताने उद्या मंगळवारी दिनांक 6 जून रोजी वणीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 6 पासून सुरू होणारे हे कार्यक्रम रात्री 10 पर्यंत शिवतीर्थ येथे रंगणार आहेत. शिवकालीन युद्धकलेचे प्रात्यक्षिके हे या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण राहणार आहे. याशिवाय शिवकालीन युद्धकला शिकवणा-या गुरुंचा यावेळी सत्कार देखील केला जाणार आहे. विशेष म्हणजे छ. शिवाजी महाराज वणी भूषण या पुरस्काराचे वितरणही यावेळी केले जाणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावावी असे आवाहन, समितीचे अध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी केले आहे.

सकाळी 6 ते स. 9 पर्यंत वाजता राज्याभिषेक सोहळा होणार आहे. संध्याकाळी 5 वाजता छत्रपती ढोल ताशा पथक वणी कडून पारंपरिक वाद्यांच्या गजरात शिवाजी महाराजांना मानवंदना दिली जाणार आहे. त्यानंतर शंभूसूर्य मर्दाणी खेळ प्रशिक्षण, जामखेड (जिल्हा अहल्या नगर) या संस्थेद्वारा शिवकालीन युद्धकलेचे प्रात्यक्षिके दाखवले जाणार आहे.

शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिकांचा थरार अनुभवा – तारेंद्र बोर्डे
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी जोपासलेल्या शिवकालीन कला आणि शस्त्रविद्येला ऐतिहासिक महत्त्व आहे. मात्र, आधुनिक काळात जगभरात नावाजलेली ही भारतीय प्राचीन युद्धकला काळाच्या ओघात लोप पाव आहे. भारताच्या या प्राचीन युद्ध कलेला जिवंत ठेवत तसेच स्व-संरक्षणासाठी तिचा वसा जपण्याच्या उद्देशाने आम्ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध संस्थेचे प्रात्यक्षिके आयोजित केले आहे. हा थरार सर्वांनी जरूर अनुभवावा
– तारेंद्र बोर्डे, अध्यक्ष – राज्याभिषेक सोहळा समिती

वणी भूषण पुरस्काराचे आयोजन
कार्यक्रमाला ओबीसी आयोग भारत सरकारचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडीया यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमात छ. शिवाजी महाराज वणी भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. याशिवाय मान्यवरांच्या हस्ते शिवकालीन युद्धकला शिकवणा-या गुरुंचा सत्कार देखील केला जाणार आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष तारेंद्र बोर्डे, उपाध्यक्ष कुणाल चोरडिया, दीपक पाऊनकर, नरेश निकम, अथर्व भोयर, नितीन नक्षिने, विपिन ठावरी, दिनेश मुरस्कर, निखिल खाडे, संतोष लकशेट्टीवार, कल्याण पांडे, हितेश गोडे, शिवम रिंगोले, निलेश परगंटीवार, सुभाष वाघडकर, प्रशांत निमकर, सुमित्रा गोडे, संध्या रामगिरीवार, विशाल मालेकर यांच्यासह शिवप्रेमी परिश्रम घेत आहे.

 

Comments are closed.