श्रावण मासानिमित्त वणी नगरीत संस्कृत शिववंदना
बहुगुणी डेस्क, वणी: संस्कृत भारतीच्या वणी शाखेच्या वतीने नेहमीच वेगवेगळ्या आणि सातत्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यापैकी एक विषय म्हणजे प्रतिवर्षी श्रावण महिन्यात पूर्ण महिनाभर टागोर चौकातील शिव मंदिरामध्ये संस्कृत शिवस्तोत्रांचे पठण होय. सार्वजनिक महिला मंडळ आणि टागोर चौक सखी वृंद यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कृत भारतीच्या वतीने चार वर्षांपूर्वी सुरू झालेला हा उपक्रम या पाचव्या वर्षीही नियमित सुरू आहे.
महर्षी पुष्पदंत विरचित अत्यंत रसाळ असे शिवमहिम्नस्तोत्र आणि इतर शिवस्तोत्रांचे पठण यानिमित्ताने या भगिनी वर्गातर्फे श्रावण महिन्यात आयोजित करण्यात येते. प्रणिता भाकरे यांच्या कल्पकतेतून सुरू झालेल्या या उपक्रमाला सातत्यपूर्ण रीतीने अक्षय ठेवण्यामध्ये कीर्ती कोंडावार,अनुश्री सालकाडे,अलका गिन्नलवार आणि मंडळच्या अन्य सदस्या परिश्रम घेत आहेत. वणी नगरीतील इतरही माता भगिनींनी या उपक्रमात सहभागी होऊन आनंद घ्यावा अशी विनंती संस्कृत भारतीने केली.