श्री मयुरेश्वर, मोरगाव

गणेशोत्सव स्पेशल लेखमाला भाग 4

0

बहुगुणी डेस्क, वणी: गाणपत्य संप्रदायाचे पृथ्वीवरील सर्वश्रेष्ठ क्षेत्र म्हणजे श्रीक्षेत्र मोरगाव. विश्वातील आद्यतम क्षेत्र म्हणून या गणेशक्षेत्राचा महिमा गायला जातो. विश्वाच्या आरंभी ओंकारातून सगुण-साकार रूपात प्रगट झालेल्या भगवान श्री शंकर, श्रीविष्णू, श्रीदेवी, श्री सूर्य आणि श्री ब्रह्मदेव या पंचेश्वरांनी एकत्रितरीत्या स्थापन केलेले हे महान क्षेत्र.

श्रीक्षेत्र मोरगावचे सगळ्यात आगळे वेगळे महत्त्व म्हणजे इथे मोरया आपल्या संपूर्ण परिवारासह विराजमान आहे. पूर्वी नावेदेखील क्वचितच ऐकलेल्या या संपूर्ण परिवाराला सांगोपांग रीतीने जाणून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड लिखित, श्री चिंचवड देवस्थान ट्रस्ट प्रकाशित ग्रंथ श्री मयुरेश्वर.

श्रीक्षेत्र मोरगाव येथे मंदिरात स्थापित असलेल्या अनेकानेक मूर्तींच्या पूजनाची श्री मुदगल पुराणाने दिलेली शास्त्रीय पद्धती म्हणजे नित्य यात्रा.  या प्रत्येक मूर्तीचे वैभव या ग्रंथात आपल्यासमोर साकार झाले आहे. आरंभी त्या मूर्तीचे महत्त्व विषद करून, त्याचे सुंदर छायाचित्र देऊन खाली त्या त्या मूर्तीच्या पूजनासाठी श्लोक दिला असल्याने हे पुस्तक जेवढे वाचनीय आहे तेवढेच आचरणीय.

मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी बाहेर दिसणाऱ्या विशाल श्रीमूषकापासून मंदिरातील प्रत्येक गोष्ट लेखकांनी बोलती केली आहे. भगवान श्रीमयुरेश्वरांचे अद्वितीय वर्णन, देवी सिद्धी बुद्धी, गणेशपुत्र श्रीलक्ष लाभ, कार्यपालक सत्ता श्री नग्न भैरव यांचे सविस्तर महात्म्य कथन करण्यात आले आहे.

त्यानंतर नित्ययात्रेच्या रूपातील चार प्रदक्षिणांमधून सर्व गणेश परिवाराचा अपूर्व परिचय करून दिला आहे. पहिल्या प्रदक्षिणेत भारताच्या आठ दिशांना असणाऱ्या श्री वक्रतुंड इ. आठ विनायक पूजनाच्या निमित्ताने संपूर्ण भारताची यात्रा संपन्न होते ही लेखकाची भूमिका मोठी आनंददायी आहे.

श्री मंदिरासह श्री ब्रह्मकमंडलू गंगा, श्रीगणेश कुंड, महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांचे जन्मस्थान, योगींद्रमठ परंपरेतील आचार्यांची समाधी स्थाने इ. अनेक बाबींचे सचित्र दर्शन ग्रंथात उपलब्ध आहे.शमी मंदार दूर्वा इत्यादी प्रिय उपचार, चतुर्थी व्रत, श्रीगणकाचार्य इ. गुरु परंपरा, मोदप्रमोद इ. गण, मूषक इ. वाहने,शूर महाशूर इ. द्वारपाल अशा अनेकानेक गोष्टींची कधीच न वाचलेल्या रोमांचकारी माहितीचे संकलन आहे ,श्री मयुरेश्वर.

नित्ययात्रे प्रमाणेच येथे द्वार यात्रा नावाचे अद्वितीय विधान आहे. त्या प्रत्येक द्वारावर असणाऱ्या तीन-तीन देवतांच्या सम्पूर्ण महात्म्याला देखील येथे सचित्र रित्या आपल्यासमोर सादर करण्यात आले आहे. या सर्व पूजनातील अंतर्गत संगती, त्यातून साधकाचा होणारा विकास याची निरूपण देखिल वेगळ्या आनंदाचा विषय आहे.

भगवान श्री मयुरेश्वर यांची दिनचर्या, मंदिरातील वार्षिक उत्सव, व्रते, उपासना, श्री चिंचवड देवस्थान ट्रस्ट तर्फे फक्त गणांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध सोयीसुविधा, अशा एक ना अनेक गोष्टींनी हे पुस्तक परिपूर्ण आहे. आज वर ज्यांनी ज्यांनी श्रीक्षेत्र मोरगावचे दर्शन घेतले आहे त्या प्रत्येकाला, अरे हे तर आपण काहीच पाहिले नाही.

जे पाहिले ते इतके भव्यदिव्य आणि महत्त्वपूर्ण आहे हे माहितीच नव्हते. असे म्हणायला भाग पाडून आता या ग्रंथाला हातात धरून पुन्हा एकदा मोरगावला जायलाच पाहिजे अशी इच्छा निश्चितपणे जागृत करणारा, आणि तशी यात्रा केल्यावर आपल्याला गणेशज्ञानाने समृद्ध करणारा ग्रंथ म्हणजे श्री मयुरेश्वर- मोरगाव.

Leave A Reply

Your email address will not be published.