मुकुटबन पोलीस ठाण्याला गटबाजीची लागण

मर्जीतील कर्मचा-यांची मजा.... अवैध धंदेवाल्यांची चांदी....

0

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या अडेगाव येथे धाड टाकून जप्त केलेल्या कोंबड्यांचं काय झालं? हा प्रश्न ताजा असतानाच आता मुकुटबन पोलीस ठाण्यात गटबाजीला उधाण आल्याची माहिती मिळत आहे. या गटबाजीतूनच परिसरात अवैध धंदे चालवणा-यांचं चांगलंच फावत असल्याचे दिसून येत आहे. मात्र यामुळे परिसरातील सामाजिक स्वास्थ मात्र बिघडत चालले आहे.

सध्या मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. यातील एक गट हा ठाणेदाराच्या बाजुचा असून यात तीन कर्मचारी आहे. यातील दोन कर्मचारी यांची बदली होऊनसुद्धा संलग्न म्हणून 4 वर्षांपेक्षा अधिक काळापासून ते मुकुटबन ठाण्यातच ठिय्या मारून असल्याची माहिती आहे. पाच वर्षांनी बदली करण्याचा शासकीय नियम असताना हे दोन कर्मचारी इतके वर्ष पोलीस ठाण्यात ठिय्या का मांडून आहे हे एक कोडेच आहे.

गटबाजीमुळे काहींची चांगलीच चांदी झाली आहे. कोरोना काळात जवळील लोकांना जवळपास ड्युटी लावणे व इतरांना खेड्यापाड्यात तसेच दूर ठिकाणी पेट्रोलिंगसाठी पाठवणे असे प्रकार देखील या गटबाजीतून चालत असल्याची चर्चा चांगलीच रंगत आहे. या गटबाजीत मात्र इतर कर्मचा-याना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. काही अर्थपूर्ण गोष्टीतून वाद झाल्यानेच ठाण्यातील एका ड्रायवर व शिपायची बदली होऊन त्यांना यवतमाळ मुख्यालयात पाठवण्यात आले असल्याचे बोलले जात आहे.

या गटबाजीचा फायदा अवैध धंदेवाल्यांनी चांगलाच उचलला आहे. परिणामी पोलिसांची प्रतिमा जनसामान्यांत मलिन होत आहे. जे जवळचे त्यांच्यावर अवैध धंदेवाल्यांची मेहरबानी तर दुरचे त्यांची बदली असे चित्र सध्या दिसून येत आहे. याच गटबाजीचा फटका एका ज्येष्ठ कर्मचा-याला बसल्याचेही बोलले जात आहे. ज्येष्ठता डावलून ज्युनियरला बिट जमादारपद दिल्याने देखील कर्मचारी वर्गात चांगलीच नाराजी पसरली आहे.

गटबाजी हा आंतरिक भाग आहे की यात काही अर्थपूर्ण गोष्टी लपल्या आहेत याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहे. शिवाय अवैध धंदेवाल्यांचे फावावे यासाठीच तर घाट नाही असाही सूर सध्या परिसरात उमटत आहे. या प्रकरणाकडे वरीष्ठ अधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी अपेक्षा सुजाण नागरिक करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.