पुरुषोत्तम नवघरे, वणी: पाकिस्तानने पोसलेल्या अतिरेक्यांनी पहलगाम येथे 26 निष्पाप पर्यटकांची गोळ्या घालून हत्या केली. त्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अभियान राबवून पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले. या अभियानात सहभागी सैनिकांच्या सन्मानार्थ वणी येथे गुरुवारी तिरंगा यात्रा काढण्यात आली. भरपावसात हजारो महिला व पुरुष या तिरंगा यात्रेत सहभागी झाले. माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या पुढाकाराने वणीतीही तिरंगा यात्रा काढण्यात आली.
यात्रेची सुरुवात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून झाली. यावेळी महाराष्ट्र गीत घेण्यात आले. पहलगाम येथे बळी पडलेल्या व देशाच्या सीमेवरील हुतात्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर शहरातील मुख्य रस्त्यावरून तिरंगा यात्रा सुरू झाली. यावेळी नागरिकांनी हाती घेतलेला तिरंगा लक्ष वेधत होता. रॅली सुरु होताच पावसाला सुरुवात झाली. मात्र विचलित न होता उपस्थित नागरिक रॅलीत शेवटपर्यंत सहभागी झाले होते. भारत मातेच्या भूमिकेत कौमुदी धनंजय सरमोकदम ही होती. टिळक चौकात या तिरंगा यात्रेचा समारोप करण्यात आला.
माजी सैनिक व सैनिकांच्या पालकांचा सत्कार
यात्रेच्या समोरोपीय कार्यक्रमात सध्या भारतीय सेनेत कार्यरत सैनिकांच्या पालकांचा साडीचोळी व शाल देऊन सन्मान करण्यात आला. सोबतच उपस्थित सर्व माजी सैनिकांचा सन्मान केला. याप्रसंगी कॅप्टन महादेव गाताडे, किरण बुजोने, संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी ऑपरेशन सिंदूरमधील वीर सैनिकांच्या शौर्याची व पराक्रमाची माहिती देऊन त्यांच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त केली.
तिरंगा यात्रेत सर्व सामाजिक संस्था, व्यापारी संघटना, गुरुदेव सेवा मंडळ, सहजयोग समिती, माजी सैनिक समिती अशा विविध संघटना सहभागी झाल्या. पाऊस असूनही भर पावसात हजारो नागरिक रॅलीत सहभागी झाले होते.



Comments are closed.