विनायक नगरमध्ये रस्त्यावर साचले पाण्याचे तळे
रहिवाशांना त्रास तर वारंवार तक्रारीनंतरही पालिका निद्रावस्थेत
बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील विनायक नगर वार्ड क्रमांक 1 मध्ये पाऊस येताच रस्त्यावर तळं साचते. यामुळे येथे राहणा-या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत वार्डातील नागरिकांनी नगरपालिकेकडे वारंवार तक्रार देखील केली. मात्र पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. लवकरच पावसाळा लागणार आहे. त्यामुळे यावर्षी तरी नगर पालिका ही समस्या सोडवणार की नाही, असा सवाल येथील नागरिक उपस्थित करीत आहे.
वणीतील नांदेपेरा रोडवर वार्ड क्रमांक 1 येथे विनायक नगर आहे. या ठिकाणी खडसे यांच्या घरासमोरील रस्त्यावरील काही भाग सखल आहे. त्यामुळे पाऊस आला की या भागात पाण्याचे तळे साचते. या ठिकाणाहून वाहने जाताच येथील पाणी रस्त्यावर राहणा-या नागरिकांच्या घरी उडते. रस्त्यावर पाणी असल्याने पाण्यातूनच दुचाकी किंवा पायदळ वाट काढावी लागते. याशिवाय पाण्याचे तळे साचल्याने येथे डासांचा उपद्रव सुरु आहे.
या भागात ही समस्या खूप आधीपासूनच आहे. रस्त्यावर साचलेले पाणी जाण्यासाठी कुठलाही मार्ग नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. याबाबत येथील नागरिकांनी वारंवार पालिकेकडे तक्रार देखील केली. मात्र त्यांच्या तक्रारीला पालिकेने केराची टोपली दाखवली. आता लवकरच पावसाळा लागणार आहे. पावसाळ्यात तर या भागात सतत पाण्याचे तळे साचलेले असते. त्यामुळे आरोग्याचाही प्रश्न पावसाळ्यात निर्माण होतो. पालिकेने याबाबत कोणतेही पाऊल उचलले नाही, तर तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे.




Comments are closed.